भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत विस्तार करण्यासाठी व्हिएतनामची वाहन उत्पादक कंपनी विनफास्टने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने भारतात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक मोटारसायकलच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले आहे. या घडामोडीमुळे विनफास्ट लवकरच भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, कंपनीने या वाहनांच्या भारतातील लॉन्चबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.
सध्या विनफास्ट भारतीय बाजारपेठेत व्हीएफ६ आणि व्हीएफ७ या इलेक्ट्रिक कारची विक्री करत आहे. आता इलेक्ट्रिक दुचाकी विभागातही विस्तार करण्याच्या दृष्टीने कंपनीने तयारी सुरू केल्याचे या पेटंटमधून संकेत मिळत आहेत.
स्कूटर आणि बाइकच्या डिझाइनमध्ये काय खास?
विनफास्टने दाखल केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाइन कंपनीने २०२५ मध्ये भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये प्रदर्शित केलेल्या व्हेंटो एस स्कूटरशी मिळते-जुळते आहे. या स्कूटरमध्ये साइड-माउंटेड मोटरची रचना पाहायला मिळते. बहुतांश इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मागील चाकात हब मोटरचा वापर केला जातो. मात्र, विनफास्टने पेटंट दाखल केलेल्या स्कूटरमध्ये मोटरची वेगळी रचना दिसते. त्यामुळे ड्राइव्ह सिस्टीम आणि रिअर सस्पेन्शनच्या मांडणीतही वेगळेपणा असण्याची शक्यता आहे.
स्कूटरसोबतच विनफास्टने इलेक्ट्रिक मोटारसायकलचेही डिझाइन पेटंट दाखल केले आहे. या पेटंटमधून स्पोर्टी लूक आणि दमदार रचनेच्या इलेक्ट्रिक बाइकची झलक पाहायला मिळते. या बाइकच्या डिझाइनमध्ये मोठे बॅटरी आणि मोटर हाउसिंग, रुंद टायर तसेच स्पोर्टी रायडिंग पोझिशन दिसून येते. कंपनीच्या इलेक्ट्रिक मोटारसायकल कॉन्सेप्ट प्लॅटफॉर्मशी या डिझाइनचे साम्य असल्याचे सांगितले जात आहे. या प्लॅटफॉर्मवर स्ट्रीट-नेकेड, क्रूझर आणि स्पोर्ट्स बाइकसारख्या प्रकारांचा समावेश आहे.
१६० किमीपर्यंत रेंज; ८९ किमी प्रतितास वेग
विनफास्टच्या संभाव्य इलेक्ट्रिक स्कूटरच्या क्षमतेचा अंदाज कंपनीने यापूर्वी प्रदर्शित केलेल्या व्हेंटो एस मॉडेलवरून लावता येतो. या व्हिएतनामी मॉडेलमध्ये ३.५ किलोवॉट-तास क्षमतेची लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी देण्यात आली होती. त्याची मोटर ५.२ किलोवॉटपर्यंत पॉवर निर्माण करते. कंपनीने या मॉडेलसाठी ८९ किमी प्रतितास कमाल वेग आणि १६० किमीपर्यंत रेंजचा दावा केला होता. मात्र, हे आकडे व्हिएतनाममध्ये प्रदर्शित झालेल्या मॉडेलचे आहेत. भारतात दाखल होणाऱ्या संभाव्य स्कूटरची बॅटरी, रेंज आणि अन्य तांत्रिक वैशिष्ट्ये अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.
विनफास्टने भारतात इलेक्ट्रिक स्कूटर आणि मोटारसायकलचे डिझाइन पेटंट दाखल केले असले, तरी त्यांच्या लॉन्चची तारीख, किंमत आणि तांत्रिक वैशिष्ट्यांबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत ही वाहने कधी दाखल होणार, याबाबत ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. डिझाइन पेटंट दाखल होणे म्हणजे वाहनाचे उत्पादन किंवा लॉन्च निश्चित झाले आहे, असे नाही. मात्र, विनफास्टच्या भारतीय बाजारपेठेतील विस्ताराच्या योजनांच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply