लग्न तोंडावर असताना नोकरी जाण्याची बातमी मिळाल्याने एका तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे. लग्नाच्या तयारीत व्यस्त असताना त्याला कंपनीतील नोकरीकपातीची चिंता सतावत होती. अखेर त्याने स्वतः व्यवस्थापकाला फोन करून विचारले आणि त्याला नोकरी जाणार असल्याची माहिती मिळाली.
हा कर्मचारी अमेरिकेतील प्रसिद्ध चिपनिर्मिती कंपनी क्वालकॉममध्ये काम करत होता. त्याने रेडिटवरील क्वालकॉम या गटामध्ये आपल्याला आलेला अनुभव शेअर केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार या महिन्याच्या अखेरीस त्याचे लग्न होणार आहे. लग्नाची तयारी आणि त्यासोबतचा ताण यामुळे आधीच घाईगडबड होती. अशातच कंपनीने नोकरकपात सुरू केल्याने आपली नोकरी जाणार की सुरक्षित राहणार, हा प्रश्न त्याला सतावत होता.
व्यवस्थापकाला फोन करून विचारले
कर्मचाऱ्याने सांगितले की त्याने व्यवस्थापकाला टीम्सवर संदेश पाठवला आणि फोन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याला उत्तर मिळाले नाही. अखेर त्याने पुन्हा फोन करून थेट विचारले की, या नोकरकपातीचा परिणाम आपल्यावर झाला आहे का आणि आपली नोकरी सुरक्षित आहे का. तेव्हा व्यवस्थापकाने त्याला नोकरी जाणार असल्याचे सांगितले आणि त्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.
कर्मचाऱ्याच्या दाव्यानुसार, कंपनी पुढील आठवड्यात म्हणजेच त्याच्या लग्नाच्या आठवड्यात ही माहिती देणार होती. पण त्याने न राहावल्याने आधीच विचारून खात्री केली.
क्वालकॉममध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात
दरम्यान, क्वालकॉममध्ये जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात नोकरकपात सुरू असल्याची चर्चा आहे. कंपनीच्या जगभरातील सुमारे 52 हजार कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 7 टक्के कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हणजेच सुमारे 3,600 पदे कमी केली जाऊ शकतात. भारतातही जवळपास 1,000 नोकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नोकरी जाण्याची बातमी मिळाल्यानंतर या कर्मचाऱ्याने सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला. कारण लग्न तोंडावर होते. त्याची पोस्ट वाचल्यानंतर अनेक रेडिट वापरकर्त्यांनी त्याला धीर दिला. लग्नाचा आनंद घे आणि जोडीदाराला ही घटना सांग, असा सल्लाही त्याला देण्यात आला. मात्र या कर्मचाऱ्याची कहाणी रेडिटवरील पोस्टवर आधारित आहे. त्याची ओळख सार्वजनिक करण्यात आलेली नाही आणि कंपनीने या विशिष्ट कर्मचाऱ्याच्या प्रकरणावर स्वतंत्र अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply