मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. यामध्ये मुंबईतील बँक, न्यायालय, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा बंगला, मुंबईच्या महापौरांचं कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, महालक्ष्मी रेसकोर्स आणि सीएसएमटी बस स्थानक अशा महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ई-मेल प्रशासनाला मिळाला आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झालं आहे.
मुंबईत तपासणीत काय आढळलं?
धमकीच्या ई-मेलमध्ये मुंबई महापालिकेचा देखील उल्लेख असल्याने महापालिकेतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. सुरक्षा यंत्रणांनी मुंबई महापालिका परिसरात तपासणी केली. यावेळी काहीही संशयास्पद सापडलेलं नाही.
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धमकीचे ई-मेल येत आहेत. याआधी देशभरातील विविध न्यायालयांत बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा ई-मेल आला होता. तसंच मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बने उडवून देण्याची धमकी याआधीदेखील ई-मेलद्वारे देण्यात आली होती. काही असामाजिक घटकांकडून अशा प्रकारचे ई-मेल केले जात आहेत. या ई-मेलनंतर प्रशासनाची धावपळ होते. सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून सर्वोतोपरी काळजी घेतली जाते आणि तपासणी केली जाते.
ज्या ठिकाणी बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली, तिथे सुरक्षा यंत्रणांनी तपासणी केली असता कोणत्याही संशयास्पद गोष्टी आढळलेल्या नाहीत. पण अशा ई-मेलमुळे प्रशासनात खळबळ उडते. तसंच सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी केली जात असताना नागरिकांमध्येही भीती निर्माण होते. संबंधित ई-मेल कुणी पाठवला आहे, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. पण या प्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते, ते पाहणं महत्त्वाचं आहे.
महापालिकेत बॉम्ब शोधक पथकाची तपासणी
धमकीचा ई-मेल आल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथक मुंबई महापालिकेत दाखल झालं. या पथकाकडून संपूर्ण महापालिकेची पाहणी करण्यात आली. महापौर कार्यालयात जास्त पाहणी करण्यात आली. विविध यंत्रांच्या सहाय्याने तिथे तपासणी करण्यात आली. कारण ई-मेलमध्ये महापौर कार्यालयाचा उल्लेख होता. पण काही संशयास्पद आढळलेलं नाही.
आता धमकीचा ई-मेल कुणी केला होता? यासाठी पोलिसांकडून तपास केला जात आहे. सायबर सेलदेखील यासाठी कामाला लागलं आहे. धमकीचा ई-मेल करणाऱ्याला पकडण्यासाठी पोलीस प्रशासन कामाला लागलं आहे.
पुणे महापालिकेलाही धमकी
मुंबई पाठोपाठ पुणे महापालिकेलाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट झालं आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक पुणे महापालिकेत दाखल झालं आहे. या पथकाकडून अतिशय काटेकोरपणे तपास केला जात आहे. अद्याप तरी कोणतीही संशयास्पद वस्तू तपासात आढळलेली नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply