प्रदूषित हवा, धूर आणि हानिकारक कणांच्या संपर्कात आल्याने फुफ्फुसांची नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता कमकुवत होऊ शकते. त्यामुळे न्यूमोनियासारख्या श्वसनाच्या संसर्गाचा धोका वाढतो. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आरोग्याच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
न्यूमोनिया ही आजही श्वसनसंस्थेशी संबंधित एक गंभीर आरोग्य समस्या आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटांतील लोकांना याचा त्रास होऊ शकतो. जिवाणू आणि विषाणूंच्या संसर्गामुळे न्यूमोनिया होणे ही त्याची सामान्य कारणे आहेत. मात्र, हवेतील प्रदूषण, धूर आणि दीर्घकाळ हानिकारक कणांच्या संपर्कात राहिल्यामुळे फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि न्यूमोनियासह श्वसनाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असल्याने न्यूमोनियाबद्दल माहिती असणे, त्याची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.
न्यूमोनिया आजारात नक्की काय होते
न्यूमोनिया हा एक संसर्ग आहे, ज्यामुळे एका किंवा दोन्ही फुफ्फुसांमधील हवेच्या पिशव्यांना सूज येते. या पिशव्यांमध्ये द्रव किंवा पू साचू शकतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि शरीराला ऑक्सिजन पुरवण्याची फुफ्फुसांची क्षमता कमी होते. खोकला, ताप, थंडी वाजणे, छातीत दुखणे, धाप लागणे आणि थकवा ही न्यूमोनियाची सामान्य लक्षणे आहेत. काही वेळा, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये, गोंधळल्यासारखे वाटणे आणि नेहमीपेक्षा जास्त अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणेही दिसू शकतात.
मुंबईतील एका फुफ्फुसरोग तज्ज्ञाने सांगितले की, हवेतील प्रदूषणामुळे फुफ्फुसांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि त्यामुळे न्यूमोनियासह श्वसनाच्या संसर्गाचा धोका वाढू शकतो. पीएम २.५, पीएम १० आणि नायट्रोजन डायऑक्साइड यांसारखे प्रदूषक श्वसनमार्गाला त्रास देतात, सूज निर्माण करतात आणि संसर्ग पसरवणाऱ्या विषाणू व जिवाणूंशी लढण्याची श्वसनसंस्थेची क्षमता कमी करतात. प्रदूषित हवेत दीर्घकाळ राहिल्यामुळे फुफ्फुसे संसर्गाला अधिक बळी पडू शकतात. तसेच, संसर्गाची तीव्रताही वाढू शकते.
पाच वर्षांखालील मुले, ज्येष्ठ नागरिक, दमा किंवा सीओपीडी असलेले रुग्ण, मधुमेहाचे रुग्ण आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्तींना याचा धोका अधिक असतो. हवेची गुणवत्ता खालावत असताना श्वसनासंबंधी तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या १५ दिवसांत न्यूमोनियाची संशयित प्रकरणे सुमारे २० टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या काळात उपचारासाठी आलेल्या २५ ते ६५ वर्षे वयोगटातील प्रत्येक १० रुग्णांपैकी २ रुग्णांमध्ये सतत खोकला, ताप, छातीत दुखणे, धाप लागणे आणि खूप थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून आली.
प्रतिबंधासाठी काय करावे
हवेची गुणवत्ता खराब असताना शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, वैयक्तिक स्वच्छता राखावी, बाहेर जाताना मास्क वापरावा आणि आपल्या फुफ्फुसांची काळजी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देतात. वेळीच डॉक्टरांकडून तपासणी करून घेतल्यास संसर्गाचे निदान करता येते आणि रुग्णाला अँटिबायोटिक्स किंवा इतर उपचारांची गरज आहे का, हे ठरवता येते.
श्वास घेण्यास खूप त्रास होणे, ओठ निळसर पडणे किंवा गोंधळल्यासारखे वाटणे ही गंभीर लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे इंटरनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. छाया वाजा यांनी सांगितले. न्यूमोनिया टाळण्यासाठी तंबाखूच्या धुरापासून दूर राहावे, प्रदूषण जास्त असताना घराबाहेर जाणे कमी करावे, घरात हवा खेळती ठेवावी आणि हातांची स्वच्छता राखावी. तसेच, पात्र व्यक्तींनी न्यूमोकोकल आजार आणि इन्फ्लूएंझा यांच्यापासून संरक्षण देणारी लस घेतल्यास न्यूमोनिया होऊ शकणाऱ्या काही संसर्गांचा धोका कमी होण्यास मदत होते.
न्यूमोनियाची लक्षणे लवकर ओळखणे, त्यामागील धोक्याची कारणे समजून घेणे आणि वेळेवर उपचार घेणे यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जनजागृती आणि योग्य प्रतिबंधात्मक काळजी घेतल्यास फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राखता येते आणि या गंभीर संसर्गाचा धोका कमी करण्यास मदत होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply