हिंदू धर्मशास्त्रानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशीचा शालिग्राम देवाशी विवाह करण्यात येतो. काही ठिकाणी हा उत्सव तब्बल पाच दिवस चालतो. त्याची सुरुवात देवउठनी एकादशीपासून होते, तर कार्तिक पौर्णिमेला त्याची समाप्ती होते.
असे मानले जाते की, तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते आणि घरात आनंद व सुख-समृद्धी नांदते. ज्या घरात कौटुंबिक वाद असतील किंवा वैवाहिक जीवनात अडचणी असतील, त्यांच्यासाठी तुळशी विवाह करणे लाभदायी ठरते.
2026 चा तुळशी विवाह कधी?
पंचांगानुसार 21 नोव्हेंबर 2026 रोजी शनिवारी कार्तिक शुक्ल द्वादशीच्या दिवशी तुळशी विवाह करण्यात येणार आहे. या दिवशी शालिग्राम देवाचा तुळशीशी विवाह लावण्यात येतो.
शुभ मुहूर्त कोणता?
तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 21 नोव्हेंबर 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7 वाजून 49 मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्त सकाळी 4 वाजून 40 मिनिटांपासून ते सकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत आहे. अभिजीत मुहूर्त दुपारी 11 वाजून 42 मिनिटांपासून सुरू होऊन दुपारी 12 वाजून 28 मिनिटांपर्यंत असणार आहे.
तुळशी विवाह कसा करतात?
सर्वप्रथम तुळशी वृंदावन स्वच्छ करून त्याला गेरू आणि रांगोळीने सजवावे. तुळशीच्या रोपाला हळद-कुंकू लावावे. वृंदावनाभोवती फुलांची माळ, आंब्याची पाने आणि ऊस लावून मंडप तयार करावा.
तुळशीच्या रोपाला लाल किंवा पिवळे वस्त्र अर्पण करून फुलांचा हार, बांगड्या, कुंकू आणि इतर सौभाग्य अलंकार अर्पण करावेत. तुळशीच्या शेजारी पाटावर शालिग्राम किंवा श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करून त्यांना पिवळे वस्त्र, फुले आणि चंदन अर्पण करावे.
त्यानंतर तुळशी माता आणि भगवान विष्णू यांची हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून पूजा करावी. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करावी. तुळशी माता आणि शालिग्राम यांच्यामध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हणावीत. त्यानंतर अक्षता टाकून विवाह सोहळा पार पाडावा. पारंपरिक पद्धतीने तुळशीला शालिग्रामासोबत सात फेरेही दिले जातात. विवाहानंतर आरती करून गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा आणि प्रसाद वाटावा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply