शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर आला असून, सत्तासंघर्षाने टोक गाठले आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या युतीला उद्योगपती प्रकाश धारीवाल आणि माजी आमदार अॅड. अशोक पवार यांची संमती असतानाही केवळ अंतर्गत राजकीय घडामोडींमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक मितेश गादिया यांना उपनगराध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले. या घडामोडीनंतर शरद पवार गटातील नगरसेवक आक्रमक झाले असून, त्यांनी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर आरोप करत सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले आहे.
शिरूर शहराच्या राजकारणात प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांचे वर्चस्व आणि राजकीय प्रभाव नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने शरद पवार गटाला दिलेला राजकीय धक्का हा अप्रत्यक्षपणे प्रकाश धारीवाल यांच्या प्रभावाला आव्हान देण्याची खेळी असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
पत्रकार परिषदेत आरोपांची सरबत्ती
मितेश गादिया यांना पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी दिवाळीच्या मुहूर्तावर नगरसेवक तथा गटनेते रवींद्र ढोबळे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत नगरपरिषदेच्या कारभाराचा पंचनामा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, रवींद्र ढोबळे, मितेश गादिया, पाणीपुरवठा समितीच्या सभापती सुनीता पोटे, स्वप्नाली जामदार, चारुशीला कोळपकर, अमोल चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुनीता पोटे यांनी पाणीपुरवठा निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता असल्याचा आरोप केला. तसेच नगरसेवकांना विश्वासात न घेता कामे केली जात असून, पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनाच विविध कामांची कंत्राटे दिली जात असल्याचा दावाही पोटे यांनी केला. गटनेते रवींद्र ढोबळे यांनी तर शिरूर नगरपरिषदेचे कामकाज वाघोलीतून नियंत्रित होत असून, नगरपालिकेचा सर्व कारभार आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्षांचे पती हेच करीत आहेत, अशी टीका करत सध्या नगरपालिकेत वाघोली पॅटर्न सुरू असल्याचा टोला लगावला.
न्यायालयीन लढाईचा इशारा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती असताना मितेश गादिया यांना उपनगराध्यक्ष पदावरून पायउतार केल्यामुळे वेळप्रसंगी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून न्यायालयीन लढाई लढण्याचा इशाराही ढोबळे यांनी दिला. मितेश गादिया, स्वप्नाली जामदार, चारुशीला कोळपकर आणि अमोल चव्हाण या नगरसेवकांनी विकासकामांमध्ये नगराध्यक्षांकडून दुजाभाव होत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजपच्या युतीतून नगरपरिषदेत पाचर्णे समीकरण उदयास आले असले, तरी या सत्तेला शरद पवार गटाच्या आक्रमक भूमिकेमुळे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी काळात उद्योगपती प्रकाश धारीवाल आणि माजी आमदार अॅड. अशोक पवार यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष हा केवळ पदांचा राहिला नसून शिरूरच्या राजकारणातील वर्चस्वाच्या लढाईत रूपांतरित झाला आहे. त्यामुळे आगामी काळात कोणाची राजकीय खेळी यशस्वी ठरणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply