बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेप्रवासातील अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यातील काही गाणी नेहमीच गुणगुणली जातात. पण बच्चन यांचे एक सुपरहिट गाणे मुळात त्यांच्या चित्रपटासाठी बनलेच नव्हते, हे अनेकांना माहिती नसेल.
साल १९७८ मध्ये अमिताभ बच्चन यांचा डॉन चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटातील संवाद, कथा सगळेच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. डॉन चित्रपटातील खाइके पान बनारसवाला हे गाणे आजही अनेकांचे आवडते असून ऐकताना लोक ते गुणगुणतात. मात्र हे गाणे डॉन चित्रपटासाठी बनवले नसून बनारसी बाबू या चित्रपटासाठी होते.
बनारसी बाबूसाठी बनलेले गाणे
बनारसी बाबूमधील नायकाने हे गाणे नाकारले, ज्यामुळे डॉन चित्रपटातील रिक्त जागेवर हे गाणे घेण्यात आले आणि या कलाकृतीने कमालच केली. एका चित्रपटासाठी बनलेले गाणे दुसऱ्या चित्रपटात जाऊन इतिहास घडवेल, असे तेव्हा कुणालाच वाटले नसेल. आज हे गाणे डॉन चित्रपटाची ओळख बनले आहे.
किशोर कुमारांची अट आणि एका टेकमधले गाणे
या गाण्याचा किस्सा इतक्यावरच थांबत नाही. हे गाणे गायक किशोर कुमार यांनाही पसंत पडले नव्हते. अनेक अटीतटींनंतर त्यांनी गाण्यास होकार दिला. त्यांची एक रंजक अट होती की, हे गाणे ते एका टेकमध्येच गाणार. चांगले झाले तर झाले, नाही तर नाही, असे ते म्हणाले. अखेर गाणे एका टेकमध्येच छान बनले. महत्त्वाचे म्हणजे किशोर कुमार यांनी हे गाणे गाण्यासाठी खराखुरा पान मागवला आणि स्टुडिओमध्ये खाऊन थुंकले. त्यानंतर हे गाणे अजरामर झाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply