कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांची निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणुकीनंतर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला आता शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटलांवर टीका करताना त्यांच्या संपत्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. बंटी पाटील तू बंटीच राहिलास, तू कधी बंटी साहेब झालाच नाहीस, असे म्हणत त्यांनी सतेज पाटलांच्या प्रॉपर्टीत इतकी वाढ कशी झाली, असा सवाल केला होता. एकेकाळी त्यांचे वडील डी. वाय. पाटील कोल्हापूरमध्ये स्कुटरवरून फिरायचे, मग आता बंटी पाटलांकडे इतकी संपत्ती कुठून आली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. मलई खाण्यासाठीच त्यांना गोकुळची सत्ता हातात हवी आहे, अशी घणाघाती टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
धंगेकरांचा पलटवार
या टीकेला उत्तर देताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, सतेज पाटलांचे वडील स्कुटरवर फिरायचे, हे ठीक आहे. पण महाराष्ट्राने तुमची परिस्थितीही बघितली आहे. तुम्ही शबनम झोळी घेऊन हॉटेलच्या बाहेर वाट पाहत बसायचात. कोणीतरी हॉटेलच्या आत नेऊन चहा पाजतंय का, यासाठी तुम्ही वाट बघायचात, असे धंगेकर म्हणाले. तुमची परिस्थितीही या महाराष्ट्राने बघितली आहे ना. तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू-बितू होतात का, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.
सत्ता कोणाची मांडलिक नाही
धंगेकर पुढे म्हणाले की, मी चंद्रकांत दादांचं भाषण ऐकलं. हे सगळं नळावरच्या भांडणासारखं चाललंय. दमदाटी केली जात आहे. पण सत्ता ही कोणाची मांडलिक नाही, ती कोणाच्या दारात थांबत नाही. आज इथे, उद्या तिकडे असते. कधीतरी लोक चौकाचौकात मनगट धरणार आहेत, तेव्हा उत्तर देताना नाकीनऊ येईल, असेही ते म्हणाले.
दमदाटी केली नाही पाहिजे, ही लोकशाही आहे. हा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा आहे, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply