पाडव्याच्या सणानिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यांतून हजारो भाविक तुळजापुरात आले आहेत. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी आहे. अशातच आज दुपारी बिडकर तलाव परिसरात अचानक आगीचा मोठा भडका उडाला. आगीचे लोळ आणि धुराचे लोट दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये घबराट पसरली आणि अनेकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ केली.
आग कशी लागली, काय घडलं
बिडकर तलाव परिसरातील डोंगरावर अचानक आग लागली आणि काही वेळातच तिने रौद्र रूप धारण केले. डोंगरावरील वाळलेली झाडे आणि परिसरात भाविकांनी टाकलेला कचरा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आगीचा धूर आणि ज्वाळा दिसताच दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि काही काळ परिसरात गोंधळाची स्थिती होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. फटाक्यांमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.
२४ तासांत दुसरी घटना
विशेष म्हणजे गेल्या २४ तासांत तुळजापुरात आगीची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षिततेचा आणि आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सणासुदीच्या काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने अशा घटनांमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दरम्यान, अक्कलकोटमध्येही आगीची घटना घडली आहे. सोलापूर-अक्कलकोट महामार्गावरील खासगी पार्किंगमध्ये थांबलेल्या ट्रकना भीषण आग लागली. सुरुवातीला एका ट्रकला आग लागली आणि त्यानंतर शेजारी थांबलेल्या ट्रकलाही आग पसरत गेली. आतापर्यंत जवळपास ५-६ ट्रक जळून खाक झाले आहेत. अजूनही अनेक ट्रक या खासगी पार्किंगमध्ये लावलेले आहेत. अक्कलकोट नगरपरिषदेच्या अग्निशमन दलातर्फे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply