मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

जातीवादाच्या आरोपावर सतेज पाटलांचे मुश्रीफांना सडेतोड उत्तर

मुश्रीफ यांच्या जातीवादाच्या आरोपावर सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील मोर्चात सडेतोड उत्तर दिले. २५ ते ३० वर्षे काँग्रेसची धुरा सांभाळत असल्याचे त्यांनी सांगितले.

जातीवादाच्या आरोपावर सतेज पाटलांचे मुश्रीफांना सडेतोड उत्तर

गोकुळची निवडणूक आणि या निवडणुकीनंतर घडलेल्या घडामोडी सध्या राज्यातच नव्हे, तर देशात चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनेलने विजय नोंदवत महायुतीच्या पॅनेलचा पराभव केला. परंतु आता गोकुळची सत्ता काबीज करण्यासाठी राज्य सरकारने नवा निर्णय घेतला आहे. गोकुळ तसेच इतर काही सहकारी संस्थांवर चार संचालक प्रशासक म्हणून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा प्रशासकांना मतदानाचाही अधिकार देण्यात आला आहे. यामुळेच सतेज पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज कोल्हापुरात मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला हजारो शेतकरी आणि समर्थकांनी हजेरी लावली. दरम्यान, या मोर्चात सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली. सोबतच मुश्रीफांनी केलेल्या जातीवादाच्या आरोपावरही सतेज पाटलांनी सडेतोड उत्तर दिले.

निवडणुकीत कोण उभे होते?

मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत होतो. तुम्ही तुमच्या लेकरांना निवडून देण्यासाठी लढत होता. या निवडणुकीत माझे पोरगे उभे राहिलेले नव्हते. दयाजी शेळके यांच्यासारखा धनगर समाजाचा माणूस या निवडणुकीत उभा होता. बाबासाहेब देवकर यांच्यासारखा कार्यकर्ता उभा राहिला होता. आमचे सगळे २५ कार्यकर्ते या निवडणुकीत उभे राहिले होते. मी २५ कार्यकर्त्यांचे नेतृत्व करत असेल, तर यात जातीवाद कुठे आला, असा थेट सवाल सतेज पाटलांनी मुश्रीफ यांना केला.

मातंग समाजाचा सुजित पडला, त्यावर का बोलला नाहीत?

सोबतच, मी जातीवाद करणारा नाही. मी शाहू महाराजांच्या पायाजवळ बसलेलो आहे. मी जातीवाद मानणारा नाही, असे पाटील म्हणाले. गोकुळचा निकाल लागल्यानंतर हसन मुश्रीफ माझा मुलगा पडला, माझा मुलगा पडला, असे चार वेळा बोलले. पण मातंग समाजाचा सुजित मिनचकार पडला, त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलले नाही. मराठा समाजाचे युवराजबापू पडले, त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलले नाही. मी जर असे बोललो, तर चालेल का? मी असे बोलत नाही, अशी बोचरी टीका सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफांवर केली.

तसेच, एका बाजूला माझ्यावर आरोप केले जात आहेत. मी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून काँग्रेसची धुरा सांभाळतोय. मी कोणाच्याही दाराजवळ बसलो नाही. माझ्यावर जातीवादाचे आरोप करताना हसन मुश्रीफ यांनी चार वेळा विचार करायला हवा होता, असे पाटील म्हणाले. हसन मुश्रीफ १५ वर्षे माझ्या मांडीला मांडी लावून बसले होते. १५ वर्षे सत्तेत राहिले. त्यांनी १५ वर्षे गोकुळची निवडणूक राष्ट्रवादी पक्षातून लढवली. तुम्हाला गोकुळचे दार उघडता आलेले नाही. गोकुळचे दार तुम्हाला माझ्यामुळेच उघडले गेले. मी होतो, म्हणून तुम्ही गोकुळमध्ये शिरले होते, अशी आठवणही सतेज पाटलांनी मुश्रीफ यांना करून दिली.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance