मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

देशात फक्त अमूल-मदर डेअरीच राहणार? सतेज पाटलांचा आरोप

गोकुळवर संचालक नेमण्याच्या अध्यादेशावरून कोल्हापुरात मोर्चा निघाला. देशात फक्त अमूल आणि मदर डेअरी हे दोन ब्रँड ठेवण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

देशात फक्त अमूल-मदर डेअरीच राहणार? सतेज पाटलांचा आरोप

गोकुळवर चार संचालक नेमण्याचा अध्यादेश राज्य सरकारकडून काढण्यात आला आहे. यावरून आता वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज सतेज पाटील यांच्या नेतृत्वात याविरोधात कोल्हापुरात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात बोलताना सतेज पाटील यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. अमूल आणि मदर डेअरी असे दोनच ब्रँड या देशात ठेवण्याचे सरकारचे हे षडयंत्र असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.

सांगलीचा संचालक का, पाटलांचा सवाल

आज अवस्था काय आहे? मी ही संचालकांची नावे मुद्दामहून वाचून दाखवली, कारण तुम्हाला हे कळले पाहिजे की, या सरकारला या जिल्ह्यात एकही पात्र माणूस संचालक म्हणून मिळाला नाही का, असा सवाल सतेज पाटील यांनी केला. या जिल्ह्यातील एकही दूध उत्पादक यांना मिळाला नाही का? जो चौथा माणूस इथे नियुक्त होणार आहे, तो सांगलीचा आहे. मतांचा अधिकार याबद्दल आमचा न्यायालयात वाद सुरूच आहे. जनतेतील लढाईदेखील आम्ही लढत आहोतच, परंतु किमान तज्ज्ञ संचालक नेमताना ज्या गोकुळचे संकलन या कोल्हापूर जिल्ह्यातून दहा ते बारा लाख लिटरच्या वर आहे, त्या जिल्ह्यातील एकही माणूस तुम्हाला संचालक म्हणून सापडू नये, यासारखे दुसरे दुर्दैव कोणते नाही, असे ते म्हणाले. म्हणूनच मी आरोप करतोय की, उद्या हा गोकुळ दूध संघ अमूलच्या दावणीला बांधला जाणार आहे. याची सुरुवात आता सांगलीतला तज्ज्ञ संचालक देण्यापासून झाली आहे, असे पाटील म्हणाले.

सरदार पटेल मिल्क फेडरेशनचा उल्लेख

मी सातत्याने म्हणतो आहे की, सरदार पटेल मिल्क फेडरेशन नावाची एक व्यवस्था गुजरातमध्ये मागच्या वर्षी उभारली गेली आहे. एनडीडीबीचा वाटा त्यामध्ये आहे, अमूलचा वाटा त्यामध्ये आहे. बनासचा वाटा त्यामध्ये आहे. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्येच म्हटले आहे की, शंभर कोटी लिटर दूध गोळा करण्यासाठी वीस राज्यांमध्ये याचा विस्तार आम्ही पुढच्या काळात करणार आहोत. छोटे-छोटे दूध संघ हे सगळे या फेडरेशनच्या अधिपत्याखाली येतील. उद्याच्या काळामध्ये या देशात फक्त दुधाचे दोनच ब्रँड ठेवायचे, एक अमूल आणि दुसरा मदर डेअरी. हे दोन ब्रँड दुग्धजन्य पदार्थांमध्ये राहतील, बाकीच्यांनी या दोन ब्रँडच्या खाली काम करायचे, हे षडयंत्र आहे, असे पाटील म्हणाले.

तरी मी महिनाभर गोकुळमध्ये बोलत होतो, महिनाभर आरोप करत होतो, पण एकानेही माझ्या आरोपांचे खंडण केले नाही. एकानेही असे म्हटले नाही की, आम्ही गोकुळला सरदार पटेल मिल्क फेडरेशनमध्ये जाऊ देणार नाही. याचीदेखील नोंद घेतली जावी, असे यावेळी सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance