आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि अभिनेते पवन कल्याण यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. त्यांचा रशियन पत्नी अन्ना कोनिडेला यांच्यासोबतचा संसार मोडला असून दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. पवन कल्याण यांच्या कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. या वृत्तानंतर आंध्र प्रदेशात चर्चांना उधाण आलं आहे.
परस्पर सामंजस्याने वेगळं होण्याचा निर्णय
कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, घटस्फोटाचा निर्णय परस्पर सामंजस्याने घेण्यात आला आहे. दोघांनी आयुष्यातील अनेक वर्षं एकत्र घालवली. त्यानंतर परस्पर सामंजस्य आणि आदर राखत विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे. लग्नाचं नातं संपुष्टात आलं तरी पुढेही चांगले मित्र राहू, असंही दोघांनी म्हटलं आहे. मुलांची पालक म्हणून भूमिका पुढेही सुरू राहील आणि मुलांचं सुख व कल्याण याला नेहमी प्राधान्य राहील, असं कार्यालयाच्या माहितीत नमूद आहे.
गोपनीयतेचा आदर राखण्याचं आवाहन
दोघांनी हा काळ आपल्या आयुष्यातील कठीण काळ असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे दोघांच्या गोपनीयतेचा आदर करावा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. या प्रवासात साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानतानाच आपल्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. पवन कल्याण यांचा हा तिसरा विवाह होता. त्यांनी अन्ना यांच्याशी २०१३ साली विवाह केला होता. १३ वर्षांच्या संसारानंतर दोघं वेगळी होत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply