राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरून राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सर्वप्रथम विलीनीकरणावरून भूमिका मांडली आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून राजकारण तापले. मात्र आता दोन्ही गटांकडून विलीनीकरण होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशातच शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे यांनी याबाबत मोठे आणि महत्त्वाचे विधान केले आहे.
काकडे काय म्हणाले?
अंकुश काकडे म्हणाले की, राष्ट्रवादीचे काही नेते शरद पवार यांच्या संपर्कात आहेत आणि काही जण सिल्व्हर ओकला भेटत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार पवार यांना भेटणार आहेत. कदाचित ते दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेटणार असतील. मात्र काही काळापूर्वी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाची कोणतीही चर्चा झाली नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली होती. त्यांनीच आता ९० अंशांचा यु-टर्न घेतला आहे. त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे आपण सांगू शकत नाही, असे काकडे म्हणाले.
विलीनीकरणाचा मुद्दा संपला?
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस सुनील माने यांनीही या चर्चांवर पूर्णविराम लागल्याचे सांगितले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच रोहित पवार यांनीही विलीनीकरणाचा मुद्दा आपल्यासाठी संपलेला आहे, असे सांगितले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान, अजित पवार गटाच्या आमदारांनी शरद पवार यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ शरद पवार यांना भेटून गेले होते. त्यानंतर आता सर्व आमदारांनी वेळ मागितल्याने राष्ट्रवादीच्या गोटात नेमके काय चालले आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply