गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी होणार असताना सोमवारी कोल्हापुरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. सरकारने गुप्त ठेवलेली शासननियुक्त संचालकांची चार नावे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी संघर्ष मोर्चाच्या व्यासपीठावर सर्वांसमोर जाहीर केली. ही नावे गुपित राहावीत म्हणून सरकारने सर्व खबरदारी घेतली होती, तरीही ती बाहेर आली, याची चर्चा आता कोल्हापुरात रंगली आहे.
## निवडणुकीची पार्श्वभूमी
गेल्या काही दिवसांपासून गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता निवडणुकीत निवडून आलेले २५ संचालक आणि पाच शासननियुक्त संचालक यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची निवडप्रक्रिया पार पडणार आहे. महायुती सरकारने काही दिवसांपूर्वीच गोकुळवर पाच सरकारी संचालक नेमण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या चार संचालकांची नावे राज्य सरकारने गुलदस्त्यात ठेवली होती. ही नावे कोणाला कळू नयेत, यासाठी सरकारने पाच नामनिर्देशित सदस्यांच्या नावाचा समावेश असलेला शासकीय आदेश शासकीय संकेतस्थळावरही प्रसिद्ध केला नव्हता.
मात्र, सतेज पाटील यांनी सोमवारी संघर्ष मोर्चाच्या व्यासपीठावर सर्वांदेखत त्या गुप्त आदेशातील संचालकांची नावे जाहीर केली. शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे, प्रशांत भगवान पाटोले आणि कृष्णात ज्ञानदेव पाटील अशी ही चार नावे आहेत.
## नावे कशी मिळाली, यावर चर्चा
महायुती सरकारने इतकी गुप्तता आणि खबरदारी बाळगूनही, आणि सरकारी आदेश कुठेही प्रसिद्ध नसताना, ही चार नावे सतेज पाटील यांना कोणी दिली, असा प्रश्न आता विचारला जात आहे. सत्ताधारी पक्षातील एखाद्या नेत्याकडून तर तो आदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल ना, अशी चर्चा संघर्ष मोर्चानंतर कोल्हापुरात रंगली होती. सतेज पाटील यांनीही आपल्या भाषणात याबाबत सूचक भाष्य केले होते.
दुग्धविकास विभागाने गोकुळसंदर्भात आदेश काढला. हा आदेश प्रसिद्ध करु दिला नाही. सकाळपासून माझी चार माणसे बसली आहेत, दर पाच मिनिटांनी इंटरनेट बघत आहेत, आदेश प्रसिद्ध झालेला नाही. चार नावे त्यांनी स्वीकृत म्हणून पाठवली. शेवटी आम्हीही २० वर्षे सत्तेत होतो. सरकारमध्ये आम्हाला मानणारेही अधिकारी आहेत. सगळे तुमचे असेच नाही, असे सतेज पाटील यांनी म्हटले.
## चारही नावांची ओळख
बंटी पाटील यांनी नावे सांगितलेल्या चार स्वीकृत सदस्यांपैकी डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे हे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. पर्ल हॉटेलजवळ त्यांचा दवाखाना आहे. त्यांच्या म्हशी किती आहेत, माहिती नाही. तर शिवाजी दिनकर आडनाईक यांनी कोल्हापूरच्या जिल्हा बँकेत विकास अधिकारी म्हणून काम केले आहे. प्रशांत पाटोले हे सांगली जिल्ह्यातील वकील आहेत. हे नाव सगळ्यात महत्त्वाचे आहे.
जे कोल्हापूरच्या जनतेला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचा झेंडा घेऊन लढतात, नेत्याचा जयजयकार करतात, त्यांना हे चौथे नाव सांगतो. कोल्हापुरात महायुतीला जाजम उचलणाऱ्या कोणाचे नाव घेता आले नाही. भाजपमधील नाथाजी पाटलांना न्याय मिळाला नाही. राहुल पाटलांच्या बाळासाहेब खाडे यांना न्याय मिळाला नाही. मुश्रीफ यांनी ज्यांना तिकीट दिले, त्यांना न्याय मिळाला नाही. शिंदे गटात अशोक फराटे यांना न्याय मिळाला नाही. थेट सांगलीचा माणूस गोकुळमध्ये तज्ज्ञ संचालक म्हणून आणला आहे, असे सतेज पाटील यांनी म्हटले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply