दिवा परिसरातील डंपिंग ग्राऊंडला वारंवार आग लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा जळाल्यामुळे निर्माण होणारा धूर निवासी भागांपर्यंत पोहोचत असून नागरिकांना दुर्गंधी आणि प्रदूषित हवेचा सामना करावा लागत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि श्वसनविकार असलेल्या व्यक्तींना याचा अधिक धोका असल्याची भीती व्यक्त होत आहे.
अनेक वर्षांपासून कचऱ्याचा प्रश्न कायम
ठाणे महानगरपालिकेकडून गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. शहराची लोकसंख्या आणि नागरी वस्ती वाढत असताना कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी ठोस उपाययोजना होणे अपेक्षित होते. मात्र, डंपिंग ग्राऊंडवरील कचरा साचत असून त्याला वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. कचरा जळाल्याने निर्माण होणारा धूर नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. डोळ्यांची जळजळ, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आणि दम लागणे यांसारख्या समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दिवेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
हवेची गुणवत्ता तपासा, वैद्यकीय सर्वेक्षण करा
या गंभीर परिस्थितीची ठाणे महानगरपालिकेने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी केली आहे. डंपिंग ग्राऊंडवरील आग पूर्णपणे विझवून पुन्हा आग लागणार नाही, यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी आहे. परिसरातील हवेच्या गुणवत्तेची तातडीने तपासणी करण्यात यावी, असेही त्यांनी म्हटले आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय सर्वेक्षण करावे. संबंधित विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. दिवेकरांना विकास नको असे नाही; मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांना विषारी धुरात श्वास घेऊन जगण्याची वेळ येऊ नये, अशी भूमिका मुंडे यांनी मांडली आहे. ठाणे महानगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. आता महापालिका या प्रश्नाची कितपत गांभीर्याने दखल घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply