सातारा शहर आणि परिसरात नरक चतुर्दशी तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आठ वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. फटाक्यांमुळे झाडे आणि उसाचे पीक जळून खाक झाले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
## सकाळी आणि रात्री अशा दोन्ही वेळा आग
नरक चतुर्दशीच्या सकाळी किल्ले अजिंक्यतारा येथील मंगळाई देवी परिसरात आणि चारभिंती भागात फटाक्यांमुळे आग लागली. त्याचबरोबर करंजे आणि तामजाईनगर परिसरातील शेतात उसाच्या पिकाला आग लागली. या चारही ठिकाणी अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आग विझवली. या आगीत झाडे आणि उसाचे नुकसान झाले.
लक्ष्मीपूजनानंतर रात्रीच्या सुमारास शेकडो तरुण-तरुणी किल्ले अजिंक्यतारा आणि चारभिंती परिसरात शहरात फुटणारे फटाके पाहण्यासाठी तसेच फटाके फोडण्यासाठी जमले होते. या दोन्ही ठिकाणीही फटाक्यांमुळे आग लागली. माहिती मिळताच अग्निशमनची वाहने घटनास्थळी पोहोचली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुमारे अर्धा ते पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
## फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहन
नागरिकांनी हवेत उडणारे फटाके फोडताना काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य अग्निशमन अधिकारी अमित निकम यांनी केले आहे. शहर व परिसरात आगीची घटना घडल्यास अग्निशमन दल नियंत्रण कक्षाशी ०२१६२ – २३१३३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply