छत्रपती संभाजीनगर शहरातील गुंठेवारी मालमत्तांच्या नियमितीकरणासाठी राबविण्यात आलेल्या योजनेतून महापालिकेला तब्बल १४० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. गुंठेवारी नियमितीकरणाच्या माध्यमातून तिजोरीत मोठी भर पडली असून, नागरिकांनीही या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे.
महापालिकेच्या या योजनेने महसुलाच्या बाबतीत मोठी मजल मारली आहे. आतापर्यंत १२ हजार ९९२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ६ हजार ८८५ अर्जांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रक्रियेला वेग आल्याचे चित्र आहे.
शहरातील अनधिकृतपणे विकसित झालेल्या मालमत्तांना नियमानुसार अधिकृत करण्यासाठी महापालिकेने गुंठेवारी नियमितीकरणाची योजना राबवली. सुरुवातीला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे अर्ज प्रक्रिया आणि मुदतीबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या संख्येने मालमत्ताधारकांनी अर्ज दाखल केले. ३१ ऑक्टोबरपर्यंत या योजनेची मुदत होती.
मुदतवाढीचा निर्णय प्रतीक्षेत
योजनेची मुदत संपल्यानंतरही हजारो मालमत्ताधारक नियमितीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ मिळणार का, याबाबत मालमत्ताधारकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी योजनेला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.
काही मालमत्ता वक्फ बोर्डाच्या जमिनीवर, आरक्षित भूखंडांवर तसेच वर्ग दोनच्या जमिनीवर असल्याने त्यांच्या नियमितीकरणाबाबतही सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आले. या मालमत्तांचे काय होणार, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply