मुंबई: शाहरुख खानचा आगामी ‘किंग’ सिनेमा त्याच्या ‘तू मिल जाये’ या गाण्यामुळे वादात सापडला आहे. या गाण्यात दीपिका पदुकोण भगव्या रंगाच्या पोशाखात दिसते. त्यावरून पुन्हा एकदा वाद पेटला असून धर्मगुरूंनीही नाराजी व्यक्त केली आहे. या वादाची सुरुवात दिल्लीतील पटपडगंजचे भाजप आमदार रविंदर सिंग नेगी यांच्या विधानापासून झाली. त्यानंतर अयोध्येतील महंत सीताराम दास महाराज आणि जगद्गुरु परमहंस आचार्य यांनीही यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.
काहींनी याला सनातन परंपरेचा अपमान मानले, तर काहींनी थेट धमकी दिली की, जो कोणी भगव्या रंगाचा अपमान करेल, त्याला जिवंत सोडले जाणार नाही. विशेष म्हणजे, हे गाणे रिलीज झाले तेव्हाच चाहत्यांनी अशा वादाची शक्यता वर्तवली होती. शाहरुख खानच्या वाढदिवसाला हे गाणे रिलीज झाले होते. तेव्हाच हे गाणे ‘बेशरम रंग’ या गाण्याप्रमाणे वादात सापडेल, असे म्हटले जात होते.
गाण्याला सहा दिवसांत ६५ मिलियनहून अधिक व्ह्यूज
‘तू मिल जाये’ गाण्यावरून सुरू असलेला वाद अधिक वाढत असला तरी अवघ्या सहा दिवसांत या गाण्याला यूट्यूबवर ६५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्याच्या एका सीनमध्ये दीपिका पदुकोणने नारंगी रंगाचा पोशाख परिधान केला आहे. भाजप आमदार रविंदर सिंग नेगी यांनी सर्वप्रथम यावर तीव्र आक्षेप घेत, याला सनातन धर्माचा अपमान असल्याचे म्हटले. त्यांनी चित्रपटावर देशव्यापी बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
धर्मगुरूंचा इशारा
अयोध्येतील प्रसिद्ध ‘तपस्वी छावणी’चे प्रमुख जगद्गुरु परमहंस आचार्य यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या मते हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. ज्याप्रमाणे तिरंगा हा भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे, त्याचप्रमाणे भगवा रंग हा भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. भगव्या रंगाचा अपमान करणे म्हणजे भारतीय संस्कृतीचाच अपमान आहे, असे ते म्हणाले. चित्रपटातील भगव्या रंगाशी संबंधित अश्लील सीन काढून टाकलेच पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. असे केले नाही, तर ते खपवून घेतले जाणार नाही. केवळ पैसे कमावण्यासाठी जो कोणी भगव्या रंगाचा अपमान करेल, त्याचे अस्तित्वच पुसून टाकले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. जो कोणी भगव्या रंगाचा अपमान करेल, तो जिवंत राहणार नाही, असेही ते म्हणाले.
अयोध्येचे महंत सीताराम दास महाराज म्हणाले की, जर दीपिका पादुकोणने शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटातील गाण्यात भगव्या रंगाचे कपडे घालून डिस्को डान्स केला, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. त्यांनी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणला सांगितले की, जर तुम्हाला असे प्रकार करायचेच असतील, तर त्याऐवजी हिरव्या रंगाचे कपडे वापरा. हिरव्या रंगात डान्स करा, ते अधिक योग्य ठरेल. भगवा रंग हा शौर्याचे प्रतीक आहे, तो त्यागाचा रंग आहे. तो दैवी तत्त्वाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्यात वैराग्य, समर्पण व भक्ती सामावलेली आहे, असे ते म्हणाले. भगव्या रंगाला बदनाम करण्यासाठी काही जाणीवपूर्वक कारस्थान रचले जात आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
‘बेशरम रंग’ वादाची आठवण
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून असाच एक वाद निर्माण झाला होता. या गाण्यात दीपिका पदुकोणने केशरी रंगाची बिकिनी घातली होती. अनेक हिंदू संघटना, धार्मिक नेते आणि राजकीय व्यक्तींनी या रंगाला धर्माशी जोडून तो एक अपमान असल्याचे म्हटले. मध्य प्रदेशचे तत्कालीन गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि महाराष्ट्रातील भाजप नेते राम कदम यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी या गाण्यातील सीनवर आक्षेप घेतला आणि चित्रपट बॅन करण्याची किंवा सीन बदलण्याची मागणी केली. अनेक राज्यांत या चित्रपटाविरुद्ध निदर्शने झाली आणि पुतळेही जाळण्यात आले. त्यानंतर, २९ डिसेंबर २०२२ रोजी सेन्सॉर बोर्डाने संस्कृती आणि धार्मिक भावनांशी संबंधित चिंता व्यक्त करत चित्रपटात बदल करण्याचे निर्देश दिले. मात्र, केशरी बिकिनी असलेले सीन गाण्यात कायम ठेवण्यात आले होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply