राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावून घेतले असून, दुष्काळाच्या छायेत बळीराजाचे दिवाळीचे दिवसही चिंतेत जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिली आहे.
संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः धावून आले आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज ते नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा गावात शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम करणार आहेत. उद्या ते त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यासाठी गावात तयारी सुरू झाली आहे.
मंत्र्यांनाही गावात दिवाळी साजरी करण्याचे आवाहन
दिवाळीनिमित्त प्रत्येक मंत्र्याने किमान एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत सण साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. त्यानुसार ते स्वतः शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी करत आहेत. गावात मुक्काम करून ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की, शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकारला पूर्ण सहानुभूती आहे. शेतकरी सध्या दुष्काळी परिस्थिती आणि विविध नैसर्गिक संकटांना तोंड देत आहे. दिवाळीच्या आनंदात शेतकरी कुटुंबांचा सहभाग असला पाहिजे. या संकटकाळातही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
मदतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असेही फडणवीस यांनी सांगितले होते. शेतकऱ्यांसाठी सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा मुक्काम महत्त्वाचा मानला जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply