वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने जळगाव तालुक्यात विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत घरगुती ग्राहकांसह महामार्गालगतची हॉटेल, ढाबे आणि बिअर बारही तपासणीच्या कक्षेत आले आहेत. अनधिकृत वीजवापर करणाऱ्या तीन जणांवर कारवाई करून त्यांना एक लाख रुपयांहून अधिकची दंडात्मक बिले देण्यात आली आहेत.
पथकाची कारवाई आणि अनधिकृत जोडण्या रोखल्या
कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी आणि उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसोली आणि जळगाव उपविभागाच्या पथकाने ही कारवाई केली. यात कनिष्ठ अभियंता रोहन पाटील आणि सहायक अभियंता माधुरी पाटील सहभागी होते.
लमांजन येथे कनिष्ठ अभियंता अर्जुन आव्हाड यांनी एबी केबल टाकून वीजचोरीच्या प्रकारांना प्रतिबंध केला. यामुळे २३ अनधिकृत जोडण्या रोखण्यात आल्या. जनजागृतीनंतर ९० टक्के ग्रामस्थांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याची तयारी दर्शविली आहे.
आव्हाणेत ३२.५ अश्वशक्तीचा भार कमी
आव्हाणे येथे कनिष्ठ अभियंता इम्तियाज अली यांनी शेतीपंपांचे सहा अनधिकृत वीजआकडे हटविले. यातून ३२.५ अश्वशक्तीचा अनधिकृत भार आणि वितरण व्यवस्थेवरील १८ अँपिअरचा ताण कमी झाला. वीजचोरी टाळून अधिकृत जोडणीद्वारेच वीज वापरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply