दिवाळी आली की दारासमोर रांगोळी, घराघरांत पणत्यांचा प्रकाश आणि लक्ष्मीपूजनाचा उत्साह सगळीकडे पसरतो. दिवाळी म्हणजे केवळ रोषणाई नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा मोठा उत्सव आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत दिवाळीवर अनेक गाणी आली, पण काही जुनी गाणी अशी आहेत, ज्यांची जादू आजच्या काळातही कायम आहे. त्यापैकीच एक म्हणजे ६८ वर्षांपूर्वीचं आणि गीता दत्त यांच्या गोड आवाजातील एक दिवाळी गीत, जे आजही जुन्या आठवणी ताज्या करतं.
१९५८ च्या गूंज उठी शहनाईमधील गाणं
‘आई दिवाली आई’ हे गाणं १९५८ मध्ये प्रदर्शित झालं होतं आणि तेव्हापासून ते लोकांच्या मनावर राज्य करत आहे. विजय भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या गूंज उठी शहनाई या चित्रपटात हे गाणं होतं. राजेंद्र कुमार आणि अमिता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या गाण्यातून त्याकाळच्या दिवाळीचं अगदी अस्सल आणि पारंपरिक रूप पाहायला मिळतं. गाण्यातील ‘आंगन में तुलसी और जगमगाते दीप’ ही ओळ ऐकली की आजही त्या साध्या आणि पवित्र वातावरणाची जादू अनुभवायला मिळते.
वसंत देसाईंचं संगीत, भारत व्यास यांचे शब्द
आजकाल दिवाळी साजरी करण्याच्या पद्धती बदलल्या असल्या, तरी या गाण्यातील गोडवा मनाला भुरळ घालतो. या चित्रपटातील गाण्यांना वसंत देसाई यांनी संगीत दिलं होतं, तर भारत व्यास यांनी शब्द लिहिले होते. चित्रपटातील ‘जीवन में पिया तेरा साथ रहे’ आणि ‘दिल का खिलौना हाय टूट गया’ यांसारखी गाणीही गाजली. पण गीता दत्त यांनी गायलेलं ‘आई दिवाली आई’ हे गाणं दिवाळीच्या आठवणींमध्ये कायमचं अमर झालं आहे. यंदाच्या दिवाळीला जुन्या आठवणींना उजाळा देत हे गोड गाणं नक्की ऐका आणि सणाचा आनंद द्विगुणित करा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply