मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेले दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते महेश कोठारे यांच्या नावावर ‘धुमधडाका’, ‘थरथराट’, ‘झपाटलेला’ आणि ‘पछाडलेला’ यांसारखे सुपरहिट चित्रपट आहेत. यशाच्या उंचीवर असताना त्यांच्या आयुष्यात एक असा काळ आला, जेव्हा संपूर्ण कुटुंबाला मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, बँकेनं मुंबईतील त्यांच्या राहत्या घरावर जप्ती आणली. त्यांचा मुलगा आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांनी एका जुन्या मुलाखतीत त्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या आहेत.
शूटिंग सुरू असताना घर सील झालं
आदिनाथ यांनी सांगितलं की, त्यांचं पदवीचं तिसरं वर्ष नुकतंच पूर्ण झालं होतं आणि पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. त्याच काळात घरातली परिस्थिती खूपच वाईट होती. वडिलांचे मागचे दोन चित्रपट चालले नव्हते, त्यामुळे त्यांच्यावर मोठं कर्ज झालं होतं. त्या वेळी कोल्हापुरात ‘खबरदार’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं आणि आदिनाथ पहिल्यांदाच वडिलांना सहाय्यक म्हणून काम करत होते. घरात तणावाचं आणि गोंधळाचं वातावरण होतं, त्यात कामावर लक्ष केंद्रित करून चित्रपट पूर्ण करणं अवघड जात होतं. चित्रीकरण सुरू असतानाच बँकेनं मुंबईतील घर सील केलं. मुंबईत कुटुंबाचं घरच उरलं नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.
ही गोष्ट आदिनाथ यांना आणि त्यांच्या आजी-आजोबांना सांगितलीच गेली नव्हती. अशा परिस्थितीतही ‘खबरदार’चं संपूर्ण चित्रीकरण पूर्ण करण्यात आलं. त्या काळात आई-वडिलांनी कुणालाच काही कळू दिलं नाही. त्यानंतर आदिनाथ आणि आजी-आजोबा पुण्याला राहायला गेले, तर आई-बाबा मुंबईत घर शोधत होते. नंतर कुटुंब कांदिवलीत स्थलांतरित झालं. ही गोष्ट साधारण २००५ सालची असेल, असं आदिनाथ यांनी सांगितलं.
शिक्षण थांबलं नाही पाहिजे
अशा कठीण परिस्थितीतही वडिलांनी आदिनाथ यांच्या पुढच्या शिक्षणासाठी पुन्हा कर्ज घेतलं. ते कर्ज कसं फेडायचं, काय करायचं हे माहित नव्हतं, पण शिक्षण थांबता कामा नये, हीच त्यांची भूमिका होती. त्यामुळे आदिनाथ यांच्या आयुष्यात आई-वडील हेच त्यांचं खरं बळ आहेत, असं त्यांनी सांगितलं.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply