येवला शहरात यंदाची दिवाळी राजकीय चर्चांनी गाजत आहे. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी येवल्यात दिवाळीच्या शुभेच्छांचे फलक लावले असून प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिठाई वाटली आहे. शहरातील प्रमुख चौकांसह ग्रामीण भागातील गावांमध्ये हे फलक झळकले आहेत. कांदे यांच्या या अचानक झालेल्या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेकांच्या मते, कांदे याद्वारे येवल्यातील राजकीय प्रवेशाची पायाभरणी करत आहेत.
२०२९ ची निवडणूक वेगळी ठरणार
येवल्याच्या राजकारणात २०२९ ची विधानसभा निवडणूक मागील पाचही निवडणुकांपेक्षा वेगळी ठरणार आहे. ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ वाढते वय आणि तब्येतीच्या कारणास्तव निवडणूक लढणार नाहीत, असे सांगितले जाते. माजी खासदार समीर भुजबळ हे येथील उमेदवार जवळपास निश्चित मानले जातात. दुसरीकडे युवा नेते कुणाल दराडे हे रोज मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आगामी लढत भुजबळ विरुद्ध दराडे अशी होणार, अशी चर्चा आहे. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे, युवा नेते सचिन आहेर आणि भाजपच्या नेत्या अमृता पवार हेही बदलत्या राजकीय समीकरणात उमेदवार होऊ शकतात.
जनसंपर्क कार्यालयही सुरू होणार
विधानसभेची रंगीत तालीम भुजबळ, दराडे, शिंदे, आहेर आणि पवार या नावांभोवती फिरत असतानाच कांदे यांनी दिवाळीत येवल्याच्या राजकीय पटलावर एन्ट्री केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या असून इच्छुक नेत्यांमध्ये चलबिचल वाढली आहे. येवल्यातील राजकीय परिस्थितीचा फायदा उचलण्याचे कांदे यांचे बेरजेचे राजकारण असल्याचे सांगितले जाते. सद्यस्थितीत भुजबळ आणि दराडे यांच्यात मोठा संघर्ष आहे, तसाच संघर्ष भुजबळ व कांदे यांच्यातही आहे. दुसरीकडे एका पक्षात राहून कांदे आणि दराडे यांच्यातही म्हणावा असा सलोखा नाही. दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छांतून जनसंपर्क वाढवला जात असतानाच शहरातील वर्दळीच्या शनिपटांगण भागात लवकरच कांदे यांचे जनसंपर्क कार्यालय कार्यान्वित होत आहे. या माध्यमातून नागरिकांचे विविध प्रश्न सोडवले जातील, असे त्यांचे समर्थक सांगतात. कांदे यांच्या या नव्या एन्ट्रीवर मंत्री भुजबळ यांचे समर्थक काय प्रतिक्रिया व्यक्त करतात, याची जनसामान्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply