धाराशिव जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, व्यावसायिक, महिला बचत गट आणि लघुउद्योजकांच्या वाढत्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी बँकांसोबतच बँकेतर वित्तीय संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. वाहन खरेदी, शेतीसाठी ट्रॅक्टर, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, सुवर्ण कर्ज आणि सूक्ष्म लघुउद्योगांसाठी लागणारा वित्तपुरवठा आता जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सहज उपलब्ध झाला आहे. नागरिकांना या सर्व सेवांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी म्हणून १२ हून अधिक प्रमुख राष्ट्रीय वित्तीय संस्थांचा समावेश असलेली विशेष मार्गदर्शिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. धाराशिव शहरासह उमरगा, भूम, कळंब, तुळजापूर आणि इतर ग्रामीण भागांत या संस्थांच्या शाखा व सेवा कार्यान्वित आहेत.
चार प्रमुख क्षेत्रांत वर्गीकरण
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या संस्थांचे वर्गीकरण वाहन व व्यावसायिक कर्ज, किरकोळ व गृहकर्ज, सुवर्ण कर्ज आणि सूक्ष्म वित्तपुरवठा अशा चार प्रमुख क्षेत्रांमध्ये करण्यात आले आहे. व्यावसायिक वाहने, जुनी वाहने, ट्रॅक्टर व व्यवसायासाठी कर्ज, तसेच वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज, सुवर्ण कर्ज आणि महिला बचत गट व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना सूक्ष्म कर्ज अशा सेवा उपलब्ध आहेत.
एक लाखांहून अधिक कर्जदारांना ५०० कोटींचा वित्तपुरवठा
अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक कुमुद रंजन पांडा यांनी सांगितले की, खूप लोकांचे उत्पन्न कमी असते आणि आयटीआर किंवा तत्सम कागदपत्रे नसतात. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँका आणि खासगी बँकांमध्ये त्यांना कर्ज मिळत नाही. अशा कमी उत्पन्न गटातील लोकांना या वित्तीय संस्था कर्ज देतात, त्यामुळे गरिबांना लहान-मोठे व्यवसाय करून गरिबीतून बाहेर येण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात सुमारे एक लाखांपेक्षा जास्त असे कर्जदार असून, त्यांना या फायनान्स कंपन्यांनी सुमारे ५०० कोटींचा वित्तपुरवठा केलेला आहे.
कर्ज घेण्यापूर्वी दक्षता घ्या
बँकेतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेताना नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे. संबंधित संस्था भारतीय रिझर्व्ह बँकेकडे नोंदणीकृत आहे का आणि तिच्याकडे वैध प्रमाणपत्र आहे का, याची खातरजमा करावी. व्याजाचा दर, प्रोसेसिंग फी, परतफेडीचा कालावधी, विलंब शुल्क आणि कर्जवसुलीच्या नियमांची पूर्ण माहिती घेऊनच करारावर स्वाक्षरी करावी. कर्जाच्या नावाखाली आधी पैसे मागणारे एजंट, अनधिकृत मोबाइल ॲप्स आणि संशयास्पद व्यक्तींपासून सावध राहावे. अर्ज करताना ओटीपी, बँक पिन अथवा अत्यंत गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना शेअर करू नये.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply