गोकुळ दूध संघावर राज्य सरकारने चार संचालक नेमले आहेत. त्यानंतर या निर्णयावर जोरदार टीका केली जात आहे. विरोधकांकडून टीका होत असतानाच सतेज पाटील यांनीही गंभीर आरोप केले. सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांनी नाकारले, न्यायालयात दिलासा मिळणार नाही, यानंतर मंत्रिमंडळात आदेश काढल्याचे म्हटले. सरकारच्या या निर्णयानंतर प्रतिक्रिया देत त्यांनी कोल्हापूरमध्ये मोठ्या मोर्चाची घोषणा केली. ९ तारखेला हा मोर्चा काढला जाणार आहे.
गोकुळ संघ ताब्यात घेण्याचा हा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. गोकुळ संघावर चार संचालक का नेमले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सतेज पाटील यांच्याकडे बहुमत असताना सरकारने ही नेमणूक केल्याने सर्व गणितच फिसकटले, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
शिंदेसेनेची भूमिका स्पष्ट
त्यातच आता गोकुळच्या मुद्द्यावरून महायुतीमधील धुसफूस पुढे आली आहे. गोकुळमध्ये शासन नियुक्त चार सदस्यांच्या निवडीवरून शिवसेना नाराज आहे. लोकशाही मार्गाने जे सदस्य निवडून आले आहेत, त्यांचा आपण स्वीकार केला पाहिजे आणि जनतेने दिलेला कौल सन्मानाने स्वीकारला पाहिजे, असे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे म्हणणे आहे.
भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेशी शिवसेना सहमत नाही, असे स्पष्ट मत शिवसेनेने मांडल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. यामुळे महायुतीमधील वाद पुन्हा पुढे आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद उफाळला आहे. पदवीधर निवडणुकीवरून वाद सुरू झाला होता आणि आता गोकुळवरून महायुतीत हालचाली वाढल्या आहेत.
तोडगा काय निघतो, याकडे लक्ष
शिंदेंच्या शिवसेनेने आपली भूमिका जाहीर केल्याने चार संचालक गोकुळवर नियुक्त केल्याने दोन्ही पक्षांमधील वाद वाढताना दिसत आहे. यावर आता नक्की काय तोडगा निघतो, हे पाहण्यासारखे ठरणार आहे. राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply