अहिल्यानगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत यंदा कट्टर राजकीय विरोधकांनी पक्षीय बाबी बाजूला ठेवून एकत्र येण्याचा वेगळा प्रयोग केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी मिळून बॅंकेवर एकहाती सत्ता आणली. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होत आहे ती या पॅनेलला टक्कर देत विजय मिळविलेल्या खासदार नीलेश लंके आणि राम शिंदे यांच्या दोन उमेदवारांची.
लंकेंचा विजय आणि थेट इशारा
सहकार आणि कारखानदारीशी संबंध नसलेले आणि थोरात-विखे पॅनेलच्या हिटलिस्टवर असलेले खासदार नीलेश लंके यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला. विजयी सभेत त्यांनी बाळासाहेब थोरात हे आपले नेते असल्याचे सांगतानाच बॅंकेतील कारभार, कर्जवाटपातील अनियमितता आणि वसुली याबाबत थेट इशारा दिला. त्यामुळे बॅंकेत लंके यांची झालेली एन्ट्री कारखानदारांना अडचणीची ठरू शकते, असे राजकीय जाणकार बोलत आहेत.
अध्यक्षपदाची चर्चा; मुख्यमंत्री ठरवतील
संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, रणजितसिंह देशमुख, बिपीन कोल्हे आणि सचिन जगताप यांची नावे चर्चेत आहेत. थोरात-विखे पॅनेलचे सर्व संचालक एकत्र असून अध्यक्ष मुख्यमंत्री ठरवतील, असे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
एकी फक्त बॅंकेपुरती की पुढेही?
सहकाराची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा सहकारी बॅंकेचे राजकारण कायम अग्रस्थानी राहिले आहे. थोरात, विखे पाटील, कोल्हे, काळे, तनपुरे, ससाणे, गडाख, घुले पाटील, राजळे, नागवडे, जगताप, पिचड आणि कर्डीले अशा जिल्ह्यातील मात्तब्बर राजकीय घराण्यांची बॅंकेवर अनेक वर्षांपासून सत्ता राहिली आहे. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पालिका निवडणुकांत एकमेकांवर जोरदार टीका करणारे नेते बॅंकेच्या सत्तेसाठी एकत्र आले. आता लवकरच होत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर निवडणुकांत हे नेते असाच आपलेपणा दाखवणार की एकमेकांच्या विरोधात उभे राहणार, याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply