नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट परिसरात मंगळवारी दोन हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. सोलुखुम्बु जिल्ह्यातील फेरिचे हेलिपॅडवर जमिनीवर उतरताना ही धडक झाली. बर्फाळ प्रदेशात घडलेल्या या अपघातात एका भारतीय पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे. दोन्ही पायलट सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे.
व्हिडीओत काय दिसतं?
या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यानुसार काही लोक दोन्ही हेलिकॉप्टर लँड होण्याची वाट पाहत होते. अपघात होऊ शकतो हे लक्षात येताच दोन्ही पायलटांनी तो टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र ते शक्य झालं नाही. एका हेलिकॉप्टरचे पंखे दुसऱ्या हेलिकॉप्टरला लागल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर दोन्ही हेलिकॉप्टर थेट जमिनीवर आदळली आणि खाली उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच घबराट पसरली.
तपास सुरू
फिशटेल एअर आणि एअर डायनॅस्टी या कंपन्यांची ही हेलिकॉप्टर होती. पोलिसांच्या माहितीनुसार दोन्ही हेलिकॉप्टर एकाच वेळी लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यातूनच हा अपघात झाला. नेपाळमध्ये सामानाची ने-आण, गिर्यारोहकांची मदत तसेच पर्यटकांच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टरचा वापर अनेकदा केला जातो. तेथील हवामान आव्हानात्मक असतं, त्यामुळे अशा स्थितीत हेलिकॉप्टर किंवा विमान चालवणं कठीण होऊन बसतं. या घटनेचा तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply