दुष्काळामुळे आधीच शेतकरी हवालदिल झालेला असताना ऐन दिवाळीत ऊस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. उसाला साडेचार हजार रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महामार्ग रोको आंदोलन छेडले आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यावर चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर झोपून आंदोलन केले. त्यामुळे पुणे आणि बंगळूरूकडे जाणारी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली. कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
दरावरून झालेल्या चर्चा निष्फळ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदा प्रतिटन ४५०० रुपयांच्या दराची ठाम मागणी लावून धरली आहे. यावर मार्ग काढण्यासाठी सरकार, आंदोलक आणि साखर कारखानदारांमध्ये झालेल्या चर्चेच्या सर्व फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. कारखानदार उताऱ्यानुसार ३६०० ते ३८०० रुपयांपर्यंत दर देण्यास तयार असले, तरी शेतकऱ्यांनी ही ऑफर धुडकावून लावत थेट रस्त्यावर जेवणाच्या पंगती सुरू केल्या आहेत.
साखरेचे दर आणि आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा
मागील हंगामात साखरेला ४५ ते ७५ रुपये प्रति किलोचा विक्रमी दर मिळाला होता आणि तोच दर आजही ५० रुपयांच्या आसपास टिकून असतानाही शेतकऱ्यांना कमी दर दिला जात असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यामुळे चार हजार पाचशेचा दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे सत्ताधारी महायुतीची मोठी कोंडी झाली आहे. बहुतांश साखर कारखाने सत्ताधारी आमदारांच्याच ताब्यात असल्याने त्यांना हा वाढीव दर देणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे चित्र आहे. देशात साखरेचा साठा कमी असताना कारखाने वेळेत सुरू न झाल्यास साखरेचे दर आणखी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. आता साखर सम्राटांना नाराज न करता शेतकऱ्यांना सरकार कसा न्याय मिळवून देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply