अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही. हा तणाव थांबावा यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले असून, पाकिस्ताननेही दोन्ही देशांत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. तरीही होर्मुझच्या खाडीचा मुद्दा अजूनही पूर्णपणे मार्गी लागलेला नाही आणि इराण या भागातील आपले वर्चस्व सोडायला तयार नाही. कतार हा देश आता दोन्ही देशांत समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असतानाच ड्रोन पाडल्याची घटना समोर आल्याने तणाव पुन्हा वाढण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
खमीर बंदराजवळ ड्रोन नष्ट
मिळालेल्या माहितीनुसार इराणने अमेरिकेचे दोन ड्रोन नष्ट केले आहेत. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या दाव्यानुसार अमेरिकेचे दोन ड्रोन दक्षिण समुद्र किनाऱ्यावर असलेल्या खमीर या बंदराजवळ आले होते. ही माहिती मिळताच गार्ड्सने दोन्ही ड्रोन हाणून पाडले आणि नष्ट केले. नष्ट करण्यात आलेले दोन्ही ड्रोन हे LUCAS प्रकारातले होते, अशी माहिती मिळाली आहे. खमीर हे इराणसाठी दक्षिणेतील तटीय क्षेत्रातील महत्त्वाचे बंदर आहे आणि हे बंदर होर्मुझच्या खाडीजवळ आहे. याच क्षेत्रावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढलेला आहे. याच भागात काही तासांआधी तेलवाहू टँकर्स समुद्रात पेरलेल्या माईन्सला धडकले होते, त्यामुळेही दोन्ही देशांत आणखी वाद वाढला आहे.
टँकर माईन्सवर आदळल्याची घटना
होर्मुझच्या खाडीत तीन तेल टँकर पाण्याखाली पेरलेल्या माईन्सवर आदळले. यामुळे या तिन्ही टँकरचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार हे तिन्ही टँकर परवानगी नसलेल्या मार्गाने जात होते. याच वेळी हे तिन्ही टँकर थेट माईन्सच्या संपर्कात आले आणि त्यांचा स्फोट झाला. दरम्यान, कतारकडून दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली जात असून, दोन्ही देश या मध्यस्थीकडे सकारात्मकपणे पाहत आहेत, असे सांगितले जाते. असे असताना ड्रोन पाडल्याची घटना समोर आली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply