गोकूळ दूध संघाच्या सत्तेवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की गोकूळची सत्ता हातून गेल्याने सत्ताधारी अस्वस्थ झाले आहेत आणि लोकशाहीचा कौल झुगारून गोकूळवर चार संचालक नेमण्याचा घाट घातला जात आहे. गोकूळ बळकावण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राऊत यांच्या मते, गोकूळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनलने २५ पैकी १३ जागा जिंकल्या आहेत आणि त्यांना बहुमत मिळाले आहे. साडेपाच लाख दूध उत्पादकांनी त्यांना मतदान केले आहे. त्यामुळे त्यांचाच अध्यक्ष झाला पाहिजे होता, असे राऊत म्हणाले. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांसारखे लोक बहुमताचा अनादर करून अध्यक्ष निवडू देत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील लोकशाही सरकारमुळेच धोक्यात आली असून सत्ताधारीच लोकशाहीचे मारेकरी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
चार तज्ज्ञ संचालकांचा आरोप
राऊत यांचा आरोप आहे की फडणवीस सरकार आता खास गोकूळसाठी नवीन कायदा आणत आहे आणि गोकूळमध्ये चार तज्ज्ञ संचालक घुसवून स्वतःचे बहुमत करून संघ ताब्यात घेण्याचा त्यांचा इरादा आहे. गोकूळ हे अमूलला विकायचे आहे आणि तो डाव शेतकऱ्यांनी हाणून पाडला, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांनी सतेज पाटील यांचे १३ संचालक निवडून आणले, तर विरोधकांनी दोन संचालक चोरले, अन्यथा बहुमत १५ चे असते, असा दावाही राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले की भाजपविरोधातील तिरस्कार असा निर्माण झाला आहे, हे त्यांना सहकार मंत्रालयाचे प्रमुख असलेल्या अमित शाह यांना सांगायचे आहे. महाराष्ट्रातील किंवा इतर राज्यांतील सहकारी संस्था ताब्यात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सतेज पाटील यांचे बहुमत असतानाही चार अतिरिक्त संचालक लादणे आणि मुख्यमंत्री म्हणून अध्यादेश काढणे ही लोकशाहीच्या नावाने चाललेली मनमानी असून बहुमताचा अनादर करणे ही लोकशाहीची हत्या असल्याचेही ते म्हणाले. राज्यातील सर्व पक्ष एकत्र येतील आणि गोकूळच्या मागे उभे राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.
शेतकऱ्यांना मदतीवरूनही टीका
शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात असल्यावरूनही राऊत यांनी टीका केली. पाच हजार रुपये ही तुटपुंजी मदत असून विरोधक त्यावर बोलणारच, असे ते म्हणाले. अलिशान गाड्यांमधून कोण फिरते, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री, त्यांचे कुटुंबीय आणि मंत्री रिक्षातून फिरत आहेत का, असा टोलाही त्यांनी लगावला. लोकशाहीत राज्यकर्त्यांना राग येता कामा नये आणि प्रश्न विचारल्यावर राग येणे योग्य नाही, असेही राऊत म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply