सकाळी दात घासताना अनेकदा आपण घाई करतो. मात्र याच घाईत रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत धक्कादायक घटना घडली. दात घासत असताना ५० वर्षीय राजेंद्र मालुसरे यांनी चुकून संपूर्ण टूथब्रशच गिळला आणि तो थेट त्यांच्या पोटात अडकला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एक्स-रेमध्ये टूथब्रश दिसला नाही
राजेंद्र मालुसरे हे पेणमध्ये राहतात आणि ऑटो रिक्षा चालवण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे सकाळी दात घासत असताना त्यांच्या हातून चुकून संपूर्ण टूथब्रश गिळला गेला. टूथब्रश थेट पोटात गेल्याने ते घाबरले आणि त्यांनी जवळच्या एका डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांना एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. मात्र टूथब्रश प्लास्टिक आणि फायबरचा असल्याने एक्स-रेमध्ये तो स्पष्टपणे दिसला नाही. त्यामुळे पुढील तपासणी आणि उपचारांसाठी राजेंद्र यांना नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयात पाठवण्यात आले.
शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीने टूथब्रश बाहेर
मेडिकव्हर रुग्णालयात राजेंद्र यांची एंडोस्कोपीद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीत संपूर्ण टूथब्रश त्यांच्या पोटात अडकल्याचे समोर आले. त्यानंतर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एंडोस्कोपिस्ट डॉ. रावसाहेब राठोड यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. कोणतीही शस्त्रक्रिया न करता एंडोस्कोपीच्या मदतीने पोटातील टूथब्रश बाहेर काढण्यात आला. वेळेत उपचार मिळाल्यामुळे राजेंद्र यांना मोठ्या धोक्यातून वाचवता आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर काही तासांतच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply