ठाणे शहरात क्लस्टर विकास, झोपडपट्टी पुनर्वसन आणि पुनर्विकास योजना वेगाने पुढे जात असताना, या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी मालमत्तेची पात्रता सिद्ध करावी लागते. त्यासाठी मालमत्ता कराच्या पावत्या महत्त्वाच्या ठरतात. याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रांच्या आधारे करपावत्या तयार करणारे रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे.
पाचपाखाडी येथील एका पुनर्विकास प्रकल्पात अशा प्रकारचा गैरव्यवहार उघडकीस आला असून, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. या माध्यमातून लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याचेही केळकर यांनी नमूद केले.
पाच वर्षांच्या करआकारणीचे विशेष ऑडिट हवे
खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित १४१व्या जनसेवकाचा जनसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केळकर यांनी ही मागणी केली. पाचपाखाडीतील प्रकरण हे केवळ एक उदाहरण असून, शहरातील इतर भागांतही अशा प्रकारांची शक्यता नाकारता येत नाही, असे ते म्हणाले. त्यामुळे केवळ एका प्रकरणापुरती चौकशी मर्यादित न ठेवता ठाणे महापालिकेने गेल्या पाच वर्षांतील मालमत्ता कर आकारणीचे विशेष ऑडिट करावे, अशी त्यांची मागणी आहे. अशा तपासणीमुळे बनावट पावत्या तयार करण्याचे प्रकार उघडकीस येतील आणि गैरप्रकारांना आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.
जंजिरा किल्ल्यावर मिशन भगवा
याच वेळी केळकर यांनी जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानने सुरू केलेल्या मिशन भगवा मोहिमेचीही माहिती दिली. या मागणीसाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाला निवेदने देण्यात आली असून, राज्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची पत्रेही सादर करण्यात आली आहेत. नुकतेच प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली किल्ल्यावर आंदोलन करण्यात आले असून, ही मोहीम पुढेही सुरू ठेवली जाणार असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेल्या केळकर यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply