कल्याण-डोंबिवली शहर स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी सोमवारी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक ते भवानी चौक आणि प्रेम ऑटो परिसरात विशेष मोहीम राबवून सखोल स्वच्छता करण्यात आली. या वेळी अनधिकृत फेरीवाले आणि पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्यांना सक्त ताकीद देण्यात आली.
पदपथ पादचाऱ्यांसाठी, अतिक्रमणासाठी नाही
मोहिमेदरम्यान रस्ते, पदपथ आणि परिसराची स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून नागरिकांच्या ये-जाला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईही करण्यात आली. पदपथ हे नागरिकांच्या पायी चालण्यासाठी आहेत, अतिक्रमणासाठी नव्हे. त्यामुळे सार्वजनिक रस्ते आणि परिसर स्वच्छ व अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी प्रशासन कोणतीही तडजोड करणार नाही, असा इशारा महापौरांनी दिला.
स्वच्छता ही शहराची ओळख बनली पाहिजे
शहरातील स्वच्छता आणि अतिक्रमणाचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ विशेष मोहिमांवर अवलंबून न राहता नियमित कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छता ही केवळ मोहीम न राहता कल्याण-डोंबिवलीची ओळख बनली पाहिजे, असे सांगत शहरात स्वच्छता आणि अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यात उपायुक्त कोकरे, सहाय्यक आयुक्त सावंत, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख अधिकारी तसेच सफाई विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply