जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे अनेकांना तरुण वयातच केस पांढरे होण्याची समस्या भेडसावते. पांढरे केस लपवण्यासाठी बाजारातील हेअर डाय, हेअर कलर आणि महागडी केमिकलयुक्त शाम्पू वापरली जातात. मात्र वारंवार केमिकल उत्पादनांचा वापर केल्याने केसांच्या समस्या कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळेही केस गळणे किंवा पांढरे होणे वाढते आणि केसांची गुणवत्ता खराब होते. अशा वेळी घरगुती उपाय हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
खोबरेल तेल आणि आवळ्याचे मिश्रण
पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी कलर किंवा हेअर डाय लावण्याऐवजी खोबरेल तेलाचा वापर करावा, असा सल्ला दिला जातो. एका वाटीत खोबरेल तेल घेऊन त्यात आवळ्याचा रस टाकून चांगले मिसळून घ्यावे. तयार झालेले मिश्रण एका टोपात ओतून थोडे गरम करून घ्यावे. त्यानंतर केस धुण्याच्या आदल्या रात्री हे तेल केसांना लावून हलक्या हाताने मसाज करावा. मसाजमुळे टाळूवरील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास हातभार लागतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी सौम्य शाम्पू वापरून केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. आठवड्यातून तीन किंवा चार वेळा आवळ्याचे हे मिश्रण केसांना लावल्यास केस मजबूत होण्यास मदत होईल, असे सांगितले जाते. खोबरेल तेल केस मऊ आणि मुलायम ठेवण्यास मदत करते आणि त्याच्या मसाजमुळे केसांची वाढही झपाट्याने होण्यास मदत होऊ शकते.
कोणती काळजी घ्यावी
केस खूप जास्त प्रमाणात गळत असतील तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. तसेच आहारात बायोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. केसांच्या वाढीसाठी आणि ते काळेभोर राहण्यासाठी वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणेही तितकेच आवश्यक आहे. हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून कोणत्याही उपायाचा दावा यात केलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply