शिक्षण घेत असतानाच शेतीत नवा प्रयोग करण्याच्या जिद्दीतून संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब येथील दोन तरुणांनी झेंडू फुलशेती यशस्वी करून दाखवली आहे. धनंजय जाधव आणि पार्थ करंडे यांनी अवघ्या पाच गुंठ्यांत झेंडूची लागवड केली आणि आतापर्यंत सुमारे २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. कृषी विभागाचे मार्गदर्शन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाची जोड यामुळे त्यांना हा आर्थिक मार्ग सापडला.
धनंजय कायद्याचे शिक्षण घेत आहेत, तर पार्थ अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. दोघांनी २२ जुलै २०२६ रोजी झेंडूच्या रोपांची लागवड करून या प्रयोगाला सुरुवात केली. शिक्षण सांभाळून स्वतः मेहनत घेत त्यांनी पाणी व्यवस्थापन, पिकाची निगा आणि फुलांची गुणवत्ता यावर लक्ष केंद्रित केले. शेतीतील अनुभव कमी असल्याने त्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनासह महाविस्तार कृत्रिम बुद्धिमत्ता या मोबाईल अॅपचा वापर केला.
पहिल्या तोडणीपासून सणासुदीची मागणी
पहिल्या तोडणीत सुमारे २२ किलो फुले मिळाली. विनोद जाधव यांच्या सहकार्याने ग्रामसुरक्षा दलासाठी फुलांची मागणी मिळाली. नवरात्रोत्सव, दसरा आणि दीपावलीच्या काळात फुलांना चांगली मागणी मिळाली. आई-वडिलांचे सहकार्य, आईच्या संपर्कातून मिळालेले ग्राहक आणि जुगाई मंदिर परिसरातील विक्रीमुळे उत्पन्न वाढण्यास मदत झाली. फुलांचा रंग आणि बाजारपेठेचा अभ्यास करताना नारंगी फुलांचे प्रमाण अधिक तर पिवळ्या फुलांचे प्रमाण कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील हंगामात अधिक क्षेत्रावर लागवड करून या प्रयोगाला व्यावसायिक स्वरूप देण्याचा त्यांचा मानस आहे.
किडीचा प्रादुर्भाव आणि तंत्रज्ञानाची मदत
झेंडूच्या पिकावर थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव झाल्याने काही झाडांचे नुकसान झाले. त्यावेळी तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांनी झेंडूच्या बागेला भेट देऊन पिकाची पाहणी केली. त्यांच्यासोबत मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर कांबळे आणि सहाय्यक कृषी अधिकारी अंतेश्वर सुस्तरफोड यांनीही मार्गदर्शन केले. प्रादुर्भाव झालेली झाडे काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला आणि महाविस्तार कृत्रिम बुद्धिमत्ता उपाययोजनेची माहिती देऊन त्याचा वापर करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने रोग आणि किडींचे निरीक्षण तसेच प्रतिबंधात्मक उपायांची माहिती मिळवता आली, त्यामुळे पिकाचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता आले. कुटुंबीय, मित्र आणि ग्राहकांच्या सहकार्याबद्दल धनंजय यांनी आभार मानले आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply