ग्रामीण भागात रानावनात, नदीकाठावर आणि झाडाझुडपांमध्ये पूर्वी सहज दिसणारी गावरान मधमाशांची मोहोळे आता दुर्मिळ होत चालली आहेत. त्यामुळे चविष्ट गावरान मध मिळणेही अवघड झाले आहे. शेतीत रासायनिक कीटकनाशके आणि तणनाशकांचा वाढता वापर, रानफुलांची तसेच झाडांची घटती संख्या, पाण्याची कमतरता आणि मधमाशांच्या नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास ही यामागची प्रमुख कारणे मानली जात आहेत.
परागीभवनावर परिणाम
मधमाशा केवळ मध तयार करणारे कीटक नाहीत, तर शेती आणि पर्यावरणातील महत्त्वाचा दुवा आहेत. फुलांवर बसताना त्यांच्यामार्फत परागीभवनाची प्रक्रिया घडते, ज्यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनाला हातभार लागतो. त्यामुळे मधमाशांची संख्या कमी झाली तर परागीभवनावर आणि पर्यायाने शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तण नियंत्रणासाठी वापरली जाणारी तणनाशके नैसर्गिक वनस्पती आणि रानफुले नष्ट करतात, परिणामी मधमाशांना मिळणारा मकरंद आणि परागकण कमी होतात. कीटकनाशकांच्या थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्काचाही त्यांच्या जीवनचक्रावर परिणाम होऊ शकतो.
संवर्धनाची गरज
पूर्वी पाणथळ जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत्या. रानगवत, रानफुले आणि फुलोऱ्यातील विविध पिकांमुळे मधमाशांना अन्न मिळत होते. आता फुले आणि पाण्याचे स्रोत कमी झाले असून कीटकनाशकांचा वापर वाढला आहे, त्यामुळे मधमाशांसारख्या लहान जीवांना तग धरणे कठीण होत असल्याचे मत प्रा. डॉ. अशोक मुंडे यांनी व्यक्त केले आहे. फुलोऱ्याच्या काळात फवारणी करताना कृषितज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि शेताच्या बांधावरील रानफुले व स्थानिक वनस्पती जपणे आवश्यक आहे. मोहोळांची संख्या नेमकी कोणत्या कारणांमुळे कमी होत आहे, याचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे असून मधमाशांना कमीत कमी हानी पोहोचवणाऱ्या तणनाशक व कीटकनाशकांबाबत संशोधन होणे आवश्यक आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply