बांगलादेशातील राजकीय आणि आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. देशातील वाढती महागाई, गंभीर वीज संकट आणि इंधन-गॅसच्या भीषण तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा संयम सुटला आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल सिटिझन पार्टीचे प्रमुख नेते नाहिद इस्लाम यांच्या नेतृत्वाखाली राजधानी ढाका येथील राष्ट्रीय संग्रहालयासमोर हजारो आंदोलकांनी एकत्र येत सरकारविरोधात एल्गार पुकारला. या आंदोलनात दिल्ली नाही, ढाका अशा भारतविरोधी घोषणा देण्यात आल्या, ज्यामुळे दक्षिण आशियातील राजनैतिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
रॅलीला संबोधित करताना आंदोलकांनी बांगलादेशच्या सध्याच्या प्रशासनावर जोरदार टीका केली. जुलै 2024 च्या जनउठावातून शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकणाऱ्या आंदोलनातील प्रमुख चेहरा असलेले नाहिद इस्लाम यांनी थेट पंतप्रधान तारिक रहमान यांच्यावर निशाणा साधला. देशातील महागाई 8.5 टक्क्यांच्या पुढे गेली असून वीज आणि गॅसच्या तुटवड्यामुळे उद्योगधंदे ठप्प पडले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. या अपयशाला जबाबदार धरत आंदोलकांनी गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद आणि ऊर्जा मंत्री इकबाल हसन महमूद टुकू यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जर या मंत्र्यांनी राजीनामे दिले नाहीत, तर संपूर्ण देशभरात आंदोलन छेडून थेट पंतप्रधानांच्या निवासाला वेढा घातला जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
आपल्या भाषणात नाहिद इस्लाम यांनी आक्रमक पवित्रा घेतला. हजारो लोकांच्या बलिदानानंतर एका हुकूमशहाला देशातून हाकलून देण्यात आले होते, परंतु आता लंडनहून परतलेले तारिक रहमान भ्रष्टाचार, लूटमार आणि वसुलीचा नवा अजेंडा घेऊन आले आहेत, असा आरोप त्यांनी केला. देशात आता एका नव्या हुकूमशहाचा उदय होत असल्याचे सांगत, जुन्या हुकूमशहाला हरवले तसेच नव्याचाही पराभव करू, असे ते म्हणाले. या वक्तव्यामुळे बांगलादेशातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गंगा पाणी वाटप करारावरून भारताला इशारा
या रॅलीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गंगा नदीच्या पाणी वाटपाचा करार. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान 12 डिसेंबर 1996 रोजी झालेला 30 वर्षांचा गंगा पाणी वाटप करार डिसेंबर 2026 मध्ये संपत आहे. या करारानुसार जानेवारी ते मे या कोरड्या कालावधीत पश्चिम बंगालमधील फरक्का बॅरेजवरून गंगेच्या पाण्याचे वाटप केले जाते. बांगलादेशात गंगा नदीला पद्मा म्हणून ओळखले जाते आणि देशातील एक तृतीयांश लोकसंख्येची उपजीविका या पाण्यावर अवलंबून आहे. कराराच्या नूतनीकरणाबाबत बोलताना नाहिद इस्लाम यांनी इशारा दिला की, जर भारतासोबत गंगा पाणी वाटप करारावर न्यायाने आणि बांगलादेशच्या हिताचे रक्षण करून पुन्हा स्वाक्षरी झाली नाही, तर बांगलादेशची जनता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल आणि हक्काच्या पाण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही.
ऑगस्ट 2024 मध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर बांगलादेशात भारतविरोधी भावना भडकावण्याचे सत्र सातत्याने सुरू आहे. फेब्रुवारी 2026 च्या निवडणुकांनंतर तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनल पार्टीचे सरकार सत्तेवर आले असले, तरी देशातील अंतर्गत आर्थिक प्रश्न मिटण्याऐवजी अधिकच गंभीर बनले आहेत. आगामी काळात डिसेंबर 2026 मधील गंगा पाणी कराराच्या नूतनीकरणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील मुत्सद्दी संबंध किती तणावपूर्ण वळण घेतात, याकडे संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply