सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शुक्रवारी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. एकूण २०१ उमेदवारांनी २३८ अर्ज दाखल केले आहेत. सोमवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात या अर्जांची छाननी होणार आहे. छाननीनंतर कोणाचे अर्ज वैध ठरतात आणि कोणाचे अपात्र, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्या मतदारसंघांत चुरस
या निवडणुकीत विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघासह पणन व कृषी प्रक्रिया तसेच नागरी बँका व पतसंस्था याठिकाणी अधिक चुरस दिसून येत आहे. विविध तालुकानिहाय जागांवर खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार अभिजित पाटील आणि आमदार बाबासाहेब देशमुख यांच्यासह माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार जयवंतराव जगताप आणि बबनराव आवताडे अशा दिग्गजांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे सोमवारच्या छाननीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, त्यातून निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
तीन तालुक्यांत बिनविरोधची शक्यता
बार्शी, मोहोळ आणि मंगळवेढा या तीन तालुक्यांमध्ये संचालक बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. बार्शीचे आमदार दिलीप सोपल आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही अर्ज न भरल्याने सोपल परिवार या निवडणुकीपासून दूर राहिला आहे. दुसरीकडे, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. बहुतांश माजी संचालकांनी स्वतःसोबतच कुटुंबातील युवा सदस्यांचेही अर्ज दाखल केले आहेत, ज्यामुळे मुख्य अर्ज अपात्र ठरल्यास कौटुंबिक पर्याय तयार राहील. त्यादृष्टीने नेत्यांनी आपापल्या कुटुंबातील मुले, पत्नी, भाऊ असे सदस्यांचे अर्ज भरून ठेवले आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply