देशाच्या सामाजिक, राजकीय इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना म्हणून नोंद असलेल्या पुणे कराराच्या ऐतिहासिक स्थळाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह परिसरात पुणे करार स्मारक उभारण्यात येणार आहे. राज्य सरकार आणि महापालिकेतर्फे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सर्व पक्षनेत्यांच्या झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
स्मारकात काय असणार
स्थायी समितीचे सदस्य सुहास टिंगरे यांनी याबाबत प्रस्ताव स्थायी समितीला दिला होता. या स्मारकाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासह ऐतिहासिक माहिती संग्रहालय विकसित करण्याची मागणी प्रस्तावाद्वारे करण्यात आली. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सर्व पक्षनेत्यांची बैठक झाली. त्यानंतर स्थायी समितीच्या बैठकीत पुणे करार स्मारकास मंजुरी देण्यात आली.
पुणे कराराचा इतिहास
ब्रिटिश सरकारने १९३२ मध्ये जाहीर केलेल्या कम्युनल ॲवॉर्डच्या पार्श्वभूमीवर वंचित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या प्रश्नावर देशभर चर्चा सुरू झाली. त्यानंतर महात्मा गांधी यांनी येरवडा कारागृहात उपोषण सुरू केले. डॉ. आंबेडकर आणि अन्य नेत्यांशी झालेल्या चर्चेतून २४ सप्टेंबर १९३२ रोजी ऐतिहासिक पुणे करार अस्तित्वात आला. २०३२ मध्ये या करारास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे कराराचा इतिहास जपण्यासाठी येरवडा कारागृहातील गांधी यार्ड आणि ऐतिहासिक आंब्याच्या झाडाचे जतन करणे गरजेचे असून, केंद्रीय डिजिटल नोंदीतही याचे महत्त्व नमूद आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply