नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वतरांगांत समुद्रसपाटीपासून सुमारे १,१५० मीटर उंचीवर वसलेले तोरणमाळ हे महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण थंड हवेच्या ठिकाणांपैकी एक आहे. कडाक्याच्या थंडीच्या दिवसांत गवताच्या पात्यांवरचे दवबिंदू गोठतात, तेव्हा हे ठिकाण देशभर चर्चेत येते. मात्र तोरणमाळचे खरे सौंदर्य केवळ त्या गोठलेल्या दवात नाही; धुक्यात हरवलेल्या पाऊलवाटा, दऱ्याखोऱ्यांतून वाहणाऱ्या वाऱ्याचे सूर, शतकानुशतके लोकस्मृतीत जपलेल्या आख्यायिका आणि जंगलाला आपले सर्वस्व मानून जगणाऱ्या आदिवासींची संस्कृती यांत ते दडले आहे.
मोठ्या शहरांपासून आणि गजबजलेल्या महामार्गांपासून तोरणमाळ काहीसे अलिप्त राहिले आहे. दळणवळणाच्या मर्यादा आणि दुर्गम भौगोलिक परिस्थिती यामुळे पर्यटनाच्या मुख्य प्रवाहात त्याला अपेक्षित स्थान मिळाले नाही. पण याच अलिप्ततेने त्याचे मूळ सौंदर्य बऱ्याच अंशी टिकून ठेवले आहे. घाटवळणांचे रस्ते, बाजूला हिरवीगार झाडी, गवताचा मखमली गालिचा पांघरलेले डोंगर, पर्वतरांगांतून खळखळणारे झरे आणि क्षितिजाचा ठाव घेऊ पाहणाऱ्या पाऊलवाटा यांमुळे तोरणमाळ अजूनही जगाच्या गजबजाटापासून दूर आहे.
नावामागच्या कथा आणि आख्यायिका
तोरणमाळ या नावाभोवती अनेक कथा गुंफल्या गेल्या आहेत. पुराणपरंपरेत ‘तूर्णमाळ’ असा उल्लेख आढळत असल्याचे सांगितले जाते. या परिसरात तोरणाची झाडे मुबलक असल्याने हे नाव पडले असावे, अशी एक व्युत्पत्ती आहे. स्थानिक आदिवासींच्या श्रद्धेत तोरणादेवीचे स्थान महत्त्वाचे आहे. सातपुड्याच्या डोंगरी प्रदेशाचे प्रवेशद्वार अथवा तोरण म्हणूनही या नावाकडे पाहिले जाते.
महाभारतकाळात युवनाश्व नावाचा राजा तोरणमाळ येथे राज्य करीत होता आणि खानदेशचा मोठा प्रदेश त्याच्या अधिपत्याखाली होता, अशी लोकपरंपरा आहे. पावसाळ्यात तोरणमाळच्या डोंगरांवर मुसळधार पाऊस पडत असे आणि घाटवाटा निसरड्या होत असत, तेव्हा हा राजा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भामेर किल्ल्यात वास्तव्य करीत असे, असे सांगितले जाते. पांडवांनी अश्वमेध यज्ञासाठी सोडलेला घोडा युवनाश्व राजाने अडवून भामेर किल्ल्यात लपवून ठेवला, पांडवांनी युद्ध करून घोडा सोडवून नेला आणि पुढे दोघांमध्ये मैत्री झाली, अशीही आख्यायिका आहे. तोरणमाळच्या किल्ल्याशी चिरंजीव अश्वत्थाम्याच्या वास्तव्याची श्रद्धाही जोडली जाते. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांच्या तपश्चर्येशी या भूमीचे नाव श्रद्धेने जोडले गेले आहे; गोरक्षनाथ मंदिर आणि मच्छिंद्रनाथांची गुंफा ही या परंपरेची जपलेली स्थाने आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला गोरक्षनाथांच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील भाविक या डोंगरमाथ्यावर एकत्र येतात.
यशवंत तलाव आणि सीताखाई
तोरणमाळला पोहोचल्यावर नजरेत भरणारा दूरवर पसरलेला निळाशार जलाशय म्हणजे यशवंत तलाव. सभोवताली हिरव्यागार झाडांची गर्दी, दूरवर डोंगरांच्या रांगा आणि पाण्यावर उमटलेली ढगांची प्रतिबिंबे यांमुळे हा तलाव ध्यानस्थ ऋषीसारखा शांत वाटतो. या परिसरात भीषण दुष्काळ पडला असता गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथांनी तपश्चर्येच्या सामर्थ्याने नर्मदा मातेला पाचारण केले आणि त्यातून या तलावाची निर्मिती झाली, अशी लोकश्रद्धा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तोरणमाळला भेट दिल्यानंतर २६ सप्टेंबर १९६९ रोजी या तलावाचे ‘यशवंत तलाव’ असे नामकरण झाल्याचा उल्लेख आढळतो. सुमारे १.५९ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या तलावात नौकानयनाचाही अनुभव घेता येतो.
तोरणमाळचे आणखी एक थक्क करणारे सौंदर्य म्हणजे सीताखाई. तीन बाजूंनी खोल फाटलेला पहाड, मध्येच उभा राहिलेला उंच सुळका, भोवताली गर्द झाडी आणि खाली नजरेचा ठाव न लागणारी दरी यांमुळे हे ठिकाण निसर्गाच्या अचाट सामर्थ्याने साकारलेले जिवंत शिल्प वाटते. पावसाळ्यात या कड्यावरून धबधबा मुक्तपणे कोसळतो. सीताखाईच्या परिसरातील कमळतलाव, खडकी आणि आमदरी परिसरातून दिसणारी सातपुड्याची विस्तीर्ण पर्वतरांग, नागार्जुन पॉइंट, सातपुडा व्ह्यू पॉइंट आणि सातपायरी घाट ही ठिकाणेही पर्यटकांना भुरळ घालतात. याच परिसरातील प्राचीन जैन लेणे, खडकात कोरलेले प्रवेशद्वार आणि पार्श्वनाथांची मूर्ती या प्रदेशातील जुन्या धार्मिक परंपरांची आठवण करून देतात. पर्यटक निवासाची व्यवस्था यापूर्वीच उभी राहिली असून जिल्हा प्रशासन स्थानिक पातळीवर ‘होम स्टे’ पद्धतीचे प्रारूप तयार करत असल्याची माहिती आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply