धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील नागरिकांनी परदेशात राहणाऱ्या आपल्या प्रियजनांना दिवाळी फराळ पाठविण्यासाठी भारतीय डाक विभागाच्या सुरक्षित, किफायतशीर आणि विश्वासार्ह सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे विभागाचे प्रवर डाक अधीक्षक संजय ताठे यांनी केले आहे.
५६ डाक कार्यालये, ४५३ शाखा
दीपावलीच्या पावन पर्वानिमित्त परदेशात वास्तव्यास असलेल्या कुटुंबीय, नातेवाईक आणि आप्तेष्टांना दिवाळी फराळ तसेच इतर अनुज्ञेय वस्तू पाठविण्यासाठी डाक विभागाची आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा धुळे विभागातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील ५६ डाक कार्यालये आणि ४५३ शाखा डाक कार्यालयांचा धुळे विभागात समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी विमा सुविधादेखील उपलब्ध आहे. पार्सल सुरक्षितरीत्या पाठविण्यासाठी डाक कार्यालयात पॅकेजिंग सुविधा उपलब्ध आहे. पाठविलेल्या पार्सलची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ट्रॅक अँड ट्रेस सुविधा उपलब्ध आहे. बुकिंगपूर्वी संबंधित डाक कार्यालयाकडून अनुज्ञेय वस्तू, आवश्यक कागदपत्रे, वजन, शुल्क आणि इतर नियमांबाबत माहिती घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
पार्सल आगाऊ बुक करण्याचे आवाहन
दिवाळीच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय पार्सलची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पार्सल शक्यतो आगाऊ बुक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. लागू शुल्क हे गंतव्य देश, वजन आणि पार्सलच्या प्रकारानुसार निश्चित केले जाईल. धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील सर्व नागरिकांनी परदेशातील आपले कुटुंबीय, नातेवाईक व प्रियजनांना दिवाळी फराळ पाठविण्यासाठी पोस्टाच्या आंतरराष्ट्रीय पार्सल सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply