मध्य रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या १८ लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. या गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा १ जानेवारी २०२७ पासून रद्द करण्यात येणार असून, त्यामुळे तिकीटाचे दर कमी होणार आहेत. सुपरफास्ट तिकिटावर आकारला जाणारा अतिरिक्त शुल्क यापुढे लागणार नसल्याने प्रवाशांच्या खिशावरचा ताण कमी होईल.
कोणत्या गाड्यांचा समावेश?
मध्य रेल्वेने निवडक लांब पल्ल्याच्या १८ मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा सुपरफास्ट दर्जा रद्द करण्याची तयारी केली आहे. १ जानेवारी २०२७ पासून या गाड्या सामान्य एक्स्प्रेस म्हणून चालवण्यात येणार आहेत. सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी-पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी-बनारस महानगरी एक्स्प्रेस आणि एलटीटी-अयोध्या कॅन्ट तुळशी एक्स्प्रेससह १८ गाड्यांच्या तिकीटाचे दर कमी होणार आहेत. यामध्ये एलटीटी-तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस, एलटीटी-करमळी एक्स्प्रेस, सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस आणि पुणे-काझीपेट एक्स्प्रेसचाही समावेश आहे. या बदलामुळे मुंबई आणि पुणे शहराला महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शहरांशी जोडणाऱ्या ८ जोड्यांमधील एकूण १८ सेवांवर परिणाम होणार आहे.
प्रवाशांनी काय तपासावे?
नव्या गाडी क्रमांकांची अंमलबजावणी १ जानेवारीपासून होणार असल्याने प्रवाशांना आरक्षण करताना नवीन क्रमांक तपासावे लागतील. तिकीट काढताना गाडीचा सुधारित क्रमांक, आरक्षणाची स्थिती आणि लागू तिकीटदर यांची खात्री करून घ्यावी, असा सल्ला रेल्वे प्रशासनाने दिला आहे. तसेच, मध्य रेल्वेकडून नवीन क्रमांकांची अधिकृत माहिती जाहीर झाल्यानंतर प्रवाशांनी त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply