सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आदिवासी परंपरेतील सुबक बोहाडा मुखवट्यांनी सन्मान करण्यात येणार आहे. प्रभु रामचंद्र आणि भगवान शंकर यांची प्रतिकृती असलेले हे बोहाडा मुखवटे आहेत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील दुर्गम गावातील कलाकाराने साकारलेल्या या मुखवट्यांना नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात स्थान मिळणार आहे.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते पंचवटीमधील रामकुंड येथे शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी ध्वजारोहणाने या पर्वाचा प्रारंभ होणार आहे. या सोहळ्याची तयारी पूर्णत्वास आली असून, राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी आदिवासी परंपरा असलेले खास बोहाडा मुखवटे साकारण्यात आले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या मार्गदर्शनाखाली हरसूल येथील एका दुर्गम आदिवासी गावातील कलाकाराने हे मुखवटे तयार केले आहेत.
दापट परिवाराची कला पुन्हा जिवंत
लुप्त होत चाललेल्या बोहाडा मुखवटे या कलेला आदिवासी विकास विभागाच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने दिलेल्या भक्कम पाठबळामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. साधारण दोन वर्षांपूर्वी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी हरसूलच्या दलपतपूर या जंगलव्याप्त गावाला भेट दिली होती. त्याप्रसंगी पिढ्यानपिढ्या बोहाडा मुखवटे बनविणाऱ्या शंकर दापट आणि त्यांच्या कुटुंबाने ही कला अक्षरशः थांबवली होती. मात्र बनसोड यांच्या पुढाकारातून दापट कुटुंबाला आर्थिक साहाय्य आणि आवश्यक प्रशिक्षण देत ही कला पुन्हा एकदा जिवंत करण्यात आली.
शंभर पाहुण्यांना शबरी उत्पादनांची भेट
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी होणाऱ्या मंत्री व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना शबरी उत्पादनांची भेट देण्यात येणार आहे. या उत्पादनांमध्ये प्रभू राम व श्री शंकर यांचा बोहाडा मुखवटा, साबण, महुआ मनुका, मध, रागी कुकिज, इंद्रायणी तांदूळ, मोहाचे तेल, मोहाचे चॉकलेट आणि मोंगी भोग यांचा समावेश आहे. शंभर पाहुण्यांना ही भेट दिली जाणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी सांगितले की, राष्ट्रपतींना सिंहस्थ ध्वजारोहणाचे निमंत्रण देताना शबरी नॅचरल उत्पादने भेट स्वरूपात देण्यात आली होती, ही अभिमानाची बाब आहे. ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी आदिवासी परंपरेचे प्रतीक असलेले बोहाडा मुखवटे राष्ट्रपतींना भेट स्वरूपात देण्यात येणार आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply