सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये येणार आहेत. त्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या हेलिकॉप्टर प्रवासावर बंदी घातली आहे. त्यामुळे राष्ट्रपतींचा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील संपूर्ण प्रवास आता रस्त्याने होणार आहे.
हेलिकॉप्टरऐवजी रस्तेमार्गे प्रवास
मूळ नियोजनानुसार राष्ट्रपती नाशिक विमानतळ ते महाराष्ट्र पोलिस अकादमी आणि तेथून त्र्यंबकेश्वर व परत नाशिक असा प्रवास हेलिकॉप्टरने करणार होत्या. महसूल, पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा गेल्या चार दिवसांपासून या दौऱ्याची तयारी करत आहेत. विमानतळ ते पंचवटीतील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर शहरात रंगीत तालीमही पार पडली. मात्र बंगालच्या उपसागरातील अर्णब चक्रीवादळामुळे २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान नाशिकसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर उड्डाणावर मर्यादा आल्या आहेत.
राष्ट्रपतींच्या हस्ते शनिवारी नाशिकमध्ये ध्वजारोहण सोहळा होईल. त्यानंतर त्या त्र्यंबकेश्वर मंदिराला भेट देऊन मंदिर व कुशावर्त तीर्थ येथे पूजन करतील. विमानतळ ते नाशिक शहर आणि नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा संपूर्ण प्रवास त्या आता वाहनाने करतील.
पोलिसांचे नव्याने नियोजन
राष्ट्रपती रस्तेमार्गे प्रवास करणार असल्याने संपूर्ण मार्गावरील सुरक्षा व्यवस्था अधिक व्यापक करावी लागणार आहे. ताफ्याच्या सुरक्षित हालचालीसाठी मार्गावरील बंदोबस्त, बॅरिकेडिंग, पर्यायी मार्ग, वाहतुकीतील बदल आणि महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा यांचा नव्याने आढावा घ्यावा लागेल. ताफा ज्या रस्त्यांवरून जाणार आहे, त्या रस्त्यांची पाहणी करून आवश्यक डागडुजी तातडीने करावी लागेल. दौऱ्यात ऐनवेळी बदल झाल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply