केंद्र सरकारने बहुप्रतीक्षित राष्ट्रीय जनगणनेच्या तारखा अखेर जाहीर केल्या आहेत. देशभरात पुढल्या वर्षी, म्हणजे २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत जनगणनेचे काम पूर्ण केले जाणार आहे. मात्र प्रशासकीय कारणे आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ज्या प्रदेशात बर्फवृष्टी होते, तसेच ज्या राज्यांमध्ये आगामी निवडणुका आहेत, त्या काही राज्यांना या वेळापत्रकातून वगळण्यात आले आहे. भारतात जनगणनेची प्रक्रिया जनगणना अधिनियम, १९४८ आणि जनगणना नियम, १९९० यानुसार पार पडते. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादीही सरकारने यापूर्वीच जाहीर केली होती.
कोणत्या राज्यांना वेगळे वेळापत्रक?
भाराचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मणिपूरमध्ये पुढील घोषणा होईपर्यंत जनगणनेबाबतची प्रक्रिया स्थगित राहणार आहे. तसेच गोवा, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, लडाख आणि हिमाचल प्रदेश, तसेच जम्मू-काश्मीरमधील बर्फवृष्टी होणाऱ्या भागांमध्येही या कालावधीत जनगणना होणार नाही. या भागांसाठी स्वतंत्र वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. देशामधील उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान जनगणनेचे काम पूर्ण केले जाईल.
स्वतःहून नोंदणीची सुविधा आणि २०२१ ची पार्श्वभूमी
यंदाच्या जनगणनेमध्ये नागरिकांना स्वतःहून आपली माहिती नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. घराघरांत जाऊन जनगणनेची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी १० जानेवारी ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत नागरिकांना स्वतःची माहिती नोंदवता येईल. त्यामुळे जनगणनेच्या प्रक्रियेत नागरिकांना सहभागी होण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.
देशात यापूर्वी २०११ साली दोन टप्प्यांत जनगणना पार पडली होती. त्यानंतर दहा वर्षांनी, म्हणजेच २०२१ साली दोन टप्प्यांत जनगणना करण्याचे नियोजन केंद्र सरकारने आखले होते. त्यानुसार एप्रिल-सप्टेंबर २०२० या काळात पहिला टप्पा आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये दुसरा टप्पा होणार होता. यासाठी आवश्यक तयारीही पूर्ण करण्यात आली होती आणि १ एप्रिल २०२० पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार होती. मात्र याच काळात देशभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्याने जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे २०२१ मध्ये होणारी जनगणना प्रत्यक्षात पार पडू शकली नाही. आता केंद्र सरकारने २०२७ मधील जनगणनेचे वेळापत्रक जाहीर केल्याने या प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply