सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दोन होतकरू युवकांच्या मधुमक्षिका पालन व्यवसायाची दखल थेट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याने घेतली आहे. कोरेगाव येथील सतीश शिर्के आणि प्रतीक कर्पे या दोन तरुणांकडून विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मधमाशांच्या पेट्या खरेदी केल्या आहेत. अलिबाग येथील त्यांच्या फार्महाऊसवर या मधमाशा परागीभवनाच्या माध्यमातून शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
आठ वर्षांपूर्वी छोट्या प्रमाणावर सुरुवात
कोरेगाव तालुक्यातील बोबडेवाडी गावचे सतीश शिर्के आणि बोरजाईवाडीचे प्रतीक कर्पे या युवा उद्योजकांनी आठ वर्षांपूर्वी अत्यंत छोट्या प्रमाणावर मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने मधमाशी पालन करण्यावर भर दिला. याच सेंद्रिय व्यवस्थापनाची माहिती विराट कोहली यांच्या टीमपर्यंत पोहोचली.
अलिबाग येथे असलेल्या त्यांच्या फार्महाऊसवर नैसर्गिक शेती केली जाते. तेथील पिकांचे उत्पन्न रसायनांवर नव्हे, तर नैसर्गिक परागीभवनावर अवलंबून असावे, या उद्देशाने कोहली दाम्पत्याने या तरुणांकडून मधमाशी पेट्या घेण्याचा निर्णय घेतला. कोरेगावसारख्या छोट्या तालुक्यातून सुरू झालेला व्यवसाय थेट राष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटीच्या फार्महाऊसवर पोहोचल्याने युवा उद्योजकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
मधमाशांमुळे उत्पादनात वाढीची अपेक्षा
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या अलिबाग येथील फार्महाऊसवर सेंद्रिय पद्धतीने शेती केली जाते. खतांचा मारा करून उत्पादन वाढले तरी आरोग्याचे धोके उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मधमाशांचे पालन करून त्यांच्या माध्यमातून परागीभवन करून शेतीचे उत्पादन वाढविण्याची ही संकल्पना आहे. यासाठी तब्बल ५० पेट्या अलिबागला पाठविण्यात आल्या आहेत. प्रत्येक पेटीमध्ये आठ ते बारा हजार मधमाशा असतात. या मधमाशांच्या माध्यमातून वीस ते तीस टक्के उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सेंद्रिय उत्पादनांना ऑनलाइन मागणी अधिक असल्यामुळे सतीश शिर्के आणि प्रतीक कर्पे यांनी आपल्या व्यवसायाची जाहिरात डिजिटल प्लॅटफॉर्मवर केली. या माध्यमातूनच कोहली यांच्या व्यवस्थापकांना या मधाची माहिती मिळाली. फार्म शेतीचे उत्पन्न वाढविण्याची चर्चा झाल्यानंतर मधुमक्षिका पालन हा विषय पुढे आला आणि कोरेगावच्या या उद्योजकांचा शोध घ्यायला सुरुवात झाली. विराट कोहली यांच्या अलिबागच्या फार्महाऊसवर मधमाशा आता फळबागा आणि भाजीपाल्याचे नैसर्गिक पद्धतीने परागीभवन करून उत्पादनात वाढ करणार आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply