वडोदरा येथे भारत आणि झिम्बाब्वे यांच्या महिला संघांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला आणि ५० षटकांच्या अखेरीस ६ गडी गमावून ३२८ धावा केल्या. त्यामुळे झिम्बाब्वे संघासमोर विजयासाठी ३२९ धावांचे लक्ष्य उभे राहिले आहे.
भारतीय डावाची सुरुवात मात्र अडखळत झाली. धावसंख्या अवघी एक असताना कर्णधार मंधाना खातेही न उघडता बाद झाली. त्यानंतर शफाली वर्मा केवळ ८ धावा करून माघारी परतली. हरमनप्रीत कौर आणि प्रतिका रावल यांनी डाव सावरला आणि संघाला शंभर धावांच्या पुढे नेले. प्रतिका ६७ चेंडूंमध्ये ६१ धावा करून बाद झाली, तर तेजल हसबनीस अवघ्या ३ धावांवर तंबूत परतली.
हरमनप्रीत आणि दिप्तीची शतके
त्यानंतर हरमनप्रीत आणि दिप्ती शर्मा यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. हरमनप्रीतने आक्रमक फलंदाजी करत १२१ चेंडूंमध्ये १२६ धावांची खणखणीत खेळी साकारली. कर्णधारपद सोडल्यानंतर तिचे हे पहिलेच शतक ठरले. तिची विकेट पडल्यानंतरही दिप्तीने आक्रमण थांबवले नाही. तिने ८६ चेंडूंमध्ये १०६ धावा करत नाबाद शतक झळकावले. या दोघींच्या खेळीमुळेच भारताला मोठी धावसंख्या गाठता आली.
झिम्बाब्वेच्या गोलंदाजीत सिबांडाने दोन गडी बाद केले, तर माकुशा, माउंगा, ग्वांनजुरा आणि चारे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यात क्रांती गौडला विश्रांती देण्यात आली असून तिच्या जागी वैष्णवी शर्माला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले आहे.
मालिका विजयाची संधी
पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर मंधानाची ही पहिलीच एकदिवसीय मालिका आहे. यापूर्वी भारतीय संघाने टी-२० मालिका ३-० अशी जिंकली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ९ गडी राखून पराभव केला होता. त्यामुळे मालिकेत भारत १-० ने आघाडीवर आहे आणि हा सामना जिंकल्यास मालिका विजयही निश्चित होणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply