वर्षानुवर्षे नळाच्या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या सातारा-देवळाईकरांच्या घरापर्यंत आता नवीन जलयोजनेचे पाणी पोचण्याची आशा निर्माण झाली आहे. मुख्य जलवाहिनीवरील क्रॉस कनेक्शन आणि जलकुंभांपर्यंतची जोडणी पूर्ण होताच नागरिकांनी नळ कनेक्शनसाठी धावपळ सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे पाच ते सहा हजार अर्ज महापालिकेकडे दाखल झाले असून, त्यापैकी तीन हजारांहून अधिक घरांना नळजोडणी देण्यात आली आहे.
जोडणीसाठीची कार्यपद्धती आणि खर्च
नवीन जल योजनेअंतर्गत ‘नो नेटवर्क’ भागातील नागरिकांना नळजोडणी देण्यासाठी महापालिकेने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यानुसार संबंधित मालमत्ताधारकाने मालमत्ता कर भरलेला असणे आवश्यक आहे; कर थकीत असल्यास आधी त्याचा भरणा करावा लागतो. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह नळजोडणीसाठी अर्ज स्वीकारला जातो. एका नळजोडणीसाठी सुमारे सहा हजार रुपये खर्च येतो. यामध्ये प्लंबरचे १,८०० रुपये शुल्क, चालू वर्षाची २,०२५ रुपये पाणीपट्टी आणि साहित्य व इतर खर्चाचे २,१७५ रुपये यांचा समावेश आहे. नळजोडणीचे काम प्लंबर असोसिएशनमार्फत केले जात आहे.
घरापर्यंतचा पाइप नागरिकांच्या खर्चाने
सहा हजार रुपयांच्या शुल्कात जागेपर्यंत नळजोडणी करून दिली जाते. मात्र घरापर्यंत पाइप टाकणे आणि त्यासंबंधीचे पुढील काम नागरिकांना स्वखर्चाने करावे लागते, अशी माहिती प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल रहीम आणि उपाध्यक्ष दिलीप बोर्डे यांनी दिली आहे. शहरातील नियमित नेटवर्क क्षेत्रातही नागरिक नळजोडणीसाठी पुढे येत आहेत. पाणीचोरीविरोधातील कारवाई आणि नवीन योजनेतून पाणीपुरवठ्यात होणारी वाढ यामुळे अधिकृत जोडण्यांकडे कल वाढला आहे. या भागात एका कनेक्शनसाठी रस्ता दुरुस्ती, बोअरिंग, पाणीपट्टी आणि प्लंबर शुल्कासह सुमारे १० ते १२ हजार रुपये खर्च येत असल्याचे असोसिएशनने सांगितले.
Leave a Reply