पिंपळगाव बसवंत येथील ‘इफको’च्या ‘नमो ड्रोन दीदी’ प्रियांका ऋषिकेश मोहिते यांनी पॅरिस येथे झालेल्या ‘सियाल पॅरिस फूड बिझनेस २०२६’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व करून देशाचा गौरव वाढवला आहे. भारत सरकार आणि इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन यांच्याकडून विशेष निवड झाल्यानंतर त्यांना भारतीय कृषी क्षेत्रातील आधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आणि महिला सक्षमीकरणाची भूमिका जागतिक स्तरावर मांडण्याची संधी मिळाली.
गृहिणीपासून प्रशिक्षित ड्रोन पायलटपर्यंतचा प्रवास
मूळच्या सांगली जिल्ह्यातील असलेल्या प्रियांका यांच्या आई अंगणवाडी सेविका आहेत, तर पती कृषी सल्लागार आहेत. एका सामान्य गृहिणीपासून ते प्रशिक्षित ड्रोन पायलट आणि ‘नमो ड्रोन दीदी’ असा त्यांचा प्रवास ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. पॅरिस दौऱ्यादरम्यान त्यांनी ‘डीडी इंडिया’ आणि ‘युरोन्यूज’च्या माध्यमातून आयोजित फ्रेंच परिषदेत भाग घेऊन भारतीय शेतीतील आधुनिकता आणि महिलांच्या वाढत्या सहभागावर प्रकाश टाकला.
कृषी ड्रोन आणि रोजगाराच्या संधींवर चर्चा
या दौऱ्यात त्यांनी आयटीपीओचे अध्यक्ष जावेद अशरफ यांच्यासोबत कृषी ड्रोनच्या प्रभावी वापरावर आणि कौशल्याधारित रोजगाराच्या संधींवर सविस्तर चर्चा केली. या यशाबद्दल त्यांनी भारत सरकार, आयटीपीओ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पिंपळगाव बसवंत ते पॅरिस असा हा प्रवास केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून, तंत्रज्ञानाच्या बळावर जागतिक ओळख निर्माण करणाऱ्या भारतीय ग्रामीण महिलांच्या सामर्थ्याचे प्रतीक मानला जात आहे.
Leave a Reply