रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धुळ्यात स्वच्छता अभियान; शालेय स्पर्धेत एकवीराचे यश

धुळ्यातील धनदाई नगरात कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गणपती मैदान परिसरात स्वच्छता अभियान झाले. बालाजी रथोत्सवात भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले.

धुळ्यात स्वच्छता अभियान; शालेय स्पर्धेत एकवीराचे यश

धुळे शहरातील प्रभाग एक मधील धनदाई नगर सांस्कृतिक व आध्यात्मिक मित्रमंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला धनदाई नगरातील गणपती मैदान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात परिसरातील उत्साही युवक आणि ज्येष्ठ नागरिक एकत्र आले होते. मैदानावरील गोळा झालेला कचरा, झाडांची वाळलेली पाने, प्लास्टिक व अन्य टाकाऊ वस्तू व्यवस्थित गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. सण-उत्सवांच्या काळात सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखण्याबाबत हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

बालाजी रथोत्सवात महाप्रसाद वाटप

अनेकविध सामाजिक उपक्रमांसाठी अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब धुळे कनेक्टतर्फे यंदाही बालाजी रथोत्सवात उपस्थित भाविकांसाठी पोहे, चहापान व शीतल पेयजल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. नगरपट्टीवरील जैन साडीसमोर उभारण्यात आलेल्या शामियान्यात हजारो भक्तांनी या सेवेचा लाभ घेतला. अध्यक्ष संतोष बिरारी, प्रोजेक्ट चेअरमन महावीर सुराणा, सचिव संजय देवरे व पब्लिक इमेज चेअर पवन खानकरी यांनी संयोजन केले.

एकवीरा विद्यालयाचे शालेय स्पर्धेत यश

जिल्हा मनपास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत एकवीरा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिहेरी उडी स्पर्धेत वैभवी पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. थाळीफेकमध्ये गार्गी बाविस्कर आणि उंच उडीत कृष्णा पाटील यांनी द्वितीय क्रमांक मिळवत विभाग स्तरावर निवड मिळवली. मुलींच्या ४×१०० रिले स्पर्धेत प्रांजल खैरनार, वैभवी पाटील, तनूश्री पाटील व जान्हवी पाटील यांनी आणि १४ वर्षांखालील मुलांच्या ४×१०० रिले स्पर्धेत भूषण पाटील, अंशुमन बागले, मनिष पाटील व वेदांत सूर्यवंशी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. प्रांजल खैरनार हिने गोळाफेकमध्ये आणि गार्गी बाविस्कर हिने सायकलींगमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक, चेअरमन, सचिव व मुख्याध्यापिका यांनी कौतुक केले.

देवरे तंत्रनिकेतनमध्ये शिक्षक-पालक सभा

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग आणि स्टुडंट्स असोसिएशनतर्फे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक-पालक सहविचार सभा नुकतीच पार पडली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, करिअरची पूर्वतयारी, प्लेसमेंटच्या संधी, ऑनलाइन परीक्षांचा अभ्यासक्रम, वर्गातील उपस्थितीचे महत्त्व आणि कौशल्य विकास यावर पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. पालकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

तरुणांसाठी योग व ध्यानाची गरज

मोराणे (ता. धुळे) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज कार्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने योग व ध्यान नशामुक्त युवक विकसित भारत १०० दिवस संकल्प कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी योगाभ्यास ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तरुणांनी नियमित योगधारणा करून शरीर व मन तंदुरुस्त ठेवावे आणि व्यसनमुक्त जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. योग प्रशिक्षक प्रा. डॉ. जितेंद्र भामरे आणि योग अभ्यासक इंजिनिअर विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम, ध्यानधारणा व योगाचे विविध प्रकार प्रात्यक्षिकांसह स्पष्ट करून दाखवले.

Updated: 21 Nov 2026 1:29 AM

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance